खडकवाडी, पळशी, वनकुटे परिसराला पावसाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:26 IST2021-09-09T04:26:01+5:302021-09-09T04:26:01+5:30
टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील पळशी, वनकुटे, खडकवाडी, ढवळपुरी परिसरात सोमवारी, मंगळवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे अनेक ...

खडकवाडी, पळशी, वनकुटे परिसराला पावसाचा तडाखा
टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील पळशी, वनकुटे, खडकवाडी, ढवळपुरी परिसरात सोमवारी, मंगळवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे अनेक घरांची पडझड झाली. अनेकांचे संसार उघड्यावर आले. पळशी ते वनकुटे, वनकुटे ते ढवळपुरी या गावांदरम्यानचे काळू नदीवरील दोन पूल वाहून गेले. त्यामुळे या भागाचा संपर्क तुटला आहे.
यंदा हंगामाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पावसाने तब्बल दीड ते दोन महिने दडी मारली होती. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, गरजेच्या वेळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, सोमवारी, मंगळवारी रात्री अचानक पावसाने हजेरी लावली.
पळशी, वनकुटे, खडकवाडी, ढवळपुरी परिसरात अतिवृष्टी झाली. टोमॅटो, डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बाजरीची काढणी सुरू आहे. काही ठिकाणी बाजरीची कणसे काटून शेतामध्येच टाकली आहेत. ती कणसे पाण्यात तरंगत आहेत. या अचानक आलेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पावसाचा सर्वाधिक फटका वनकुटे, खडकवाडी, पळशी भागाला बसला. या पावसाने काळू नदीला पूर आला. त्यामुळे पळशी ते वनकुटे, ढवळपुरी ते वनकुटे रस्त्याच्या काळू नदीवरील दोन पूल वाहून गेले. त्यामुळे या गावांचा संपर्क तुटला होता. मोठ्या प्रमाणावर घरांचीही पडझड झाली.
टाकळी ढोकेश्वर, कर्जुले हर्या, तिखोल, ढोकी, कासारे, भोंद्रे परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. परंतु, काही परिसरात ओढे, तलाव, नाले, बंधारे व विहिरी अद्यापही कोरड्या आहेत. पळशी ते वनकुटे पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील खचलेल्या पुलाची तहसीलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, सरपंच आप्पासाहेब शिंदे यांनी पाहणी केली.
---
त्वरित पंचनामे व्हावेत..
घरांची पडझड, शेतमालाच्या झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून बाधितांना मदत मिळावी. पंचनामे करून बाधितांना मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याचे आत्मा समितीचे अध्यक्ष वनकुटेचे सरपंच ॲड. राहुल झावरे यांनी सांगितले.
----
फोटो आहेत.
पारनेर तालुक्यातील पळशी, वनकुटे परिसरात अतिवृष्टीने घर, पिकांचे झालेले नुकसान.