१० जूननंतर जिल्ह्यात पावसाचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 16:28 IST2019-05-26T16:27:35+5:302019-05-26T16:28:46+5:30
विदर्भ व मराठवाड्यासह अहमदनगर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचे आगमन झाले आहे़ उकाडा असहाय झाला असून १० जूननंतर जिल्ह्यात पावसाचे आगमन होण्याचे संकेत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने दिले आहेत.

१० जूननंतर जिल्ह्यात पावसाचे आगमन
राहुरी : विदर्भ व मराठवाड्यासह अहमदनगर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचे आगमन झाले आहे़ उकाडा असहाय झाला असून १० जूननंतर जिल्ह्यात पावसाचे आगमन होण्याचे संकेत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने दिले आहेत.
गेल्या वर्षाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण वाढणार आहे़ सरासरी ९६ टक्के पाऊस होण्याची शक्यता शास्त्रज्ञ डॉ़ रवींद्र आंधळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. २९ मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे़ अहमदनगर जिल्ह्यात आज ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे़ शनिवारी जिल्ह्याचे तापमान नोंद ४१़६ सेल्सिअस होते़
आज तापमान दीड अंश सेल्सिअसने घसरले आहे़ रात्रीचे तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअस या दरम्यान राहणार आहे़ १० जूनच्या दरम्यान जिल्ह्यात पाऊस होणे अपेक्षित आहे. दोन चार दिवस पाऊस मागे पुढे होऊ शकतो.
अहमदनगर जिल्ह्याची सरासरी ९६ टक्के इतकी आहे़ यंदा सरासरी ९६ टक्के पाऊस अपेक्षित आहे़
गेल्यावर्षी अहमदनगर जिल्ह्यात केवळ २४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती़ म्हणजे गेल्या वर्षी केवळ ४४ टक्के पाऊस पडला होता़ त्यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढली होती़ यंदा पावसाचे प्रमाण वाढणार आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़
बीटी कपाशीची लागवड २५ मे रोजी करण्यास शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे़ पाऊस पडल्यानंतर कपाशीची लागवड करावी़ मे महिन्यात कपाशीची लागवड केल्यास जमिनीत उष्णतेचे प्रमाण जास्त आहे़ त्यामुळे उगवण कमी होईल़ त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात कपाशी लागवडीचा निर्णय घ्यावा़ बागायती भागात जमीन ओलावून लागवड केली तरी तापमानाचा उगवण क्षमतेवर परिणाम होणार आहे़ -डॉ़ रवींद्र आंधळे, सहयोगी प्राध्यापक, हवामान विभाग, कृषी विद्यापीठ
यंदा उष्णतेची लाट आहे़ त्यामुळे मे ऐवजी जूनच्या पहिल्या आठवड्यात कपाशीची लागवड करणार आहे़ फार उशिरा लागवड केल्यास पुढील गव्हाचे पीक घेता येत नाही़ जूनमध्ये पहिल्या आठवड्यात पाऊस आल्यास कपाशीला फायदेशीर ठरेल़ मात्र पाऊस लांबल्याने कपाशी उत्पादकांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़ यंदा चांगल्या पावसाची अपेक्षा आहे़ -विलास वराळे, अध्यक्ष, मुळाथडी शेतकरी बचत गट