कांबीला पावसाचा तडाखा, बाजारपेठेत शिरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:25 IST2021-09-06T04:25:40+5:302021-09-06T04:25:40+5:30
बोधेगाव : शनिवारी रात्रभर झालेल्या पावसाने शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील कांबी गावाला तडाखा दिला. ग्रामस्थ रात्री झोपेत असतानाच मुख्य ...

कांबीला पावसाचा तडाखा, बाजारपेठेत शिरले पाणी
बोधेगाव : शनिवारी रात्रभर झालेल्या पावसाने शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील कांबी गावाला तडाखा दिला. ग्रामस्थ रात्री झोपेत असतानाच मुख्य बाजारपेठेत पाण्याचा लोंढा आल्याने विविध व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. शेवगाव-गेवराई मार्ग बोधेगावमधील काळ्या ओढ्याला आलेल्या पाण्यामुळे रात्रीपासून बंद आहे. खरीप पिकांचेही अतोनात नुकसान झाले असून कांबीमधील काहींची जनावरे व कोंबड्या वाहून गेल्या आहेत.
शनिवारी रात्री नऊच्या सुमारास सुरू झालेला पाऊस रात्रभर कोसळत राहिला. त्यामुळे बोधेगावच्या काशी नदीला पूर आला तर शेवगाव-गेवराई मार्गावरील काळ्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने हा मार्ग रात्री अकरापासून बंद झाला. मोठी मालवाहू वाहनेच या छोट्या पुलावरून मार्गक्रमण करू शकत असून लहान वाहने, दुचाकी, पादचारी यांना मात्र येथून प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे.
कांबी येथे झालेल्या पावसामुळे येथील स्थानिक नदीला पूर आल्याने गावातील हनुमान मंदिर, ग्रामपंचायतीचे व्यापारी गाळे, तापकीर हाॅटेल, खराद कृषी सेवा केंद्र, विश्वाससानंद कृषी सेवा केंद्र, सिमेंट दुकान, चप्पल दुकान, अमोल फोटो स्टुडिओमध्ये गुडघाभर पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. सुमित पांचारिया यांची पाळीव जनावरे वाहून गेली तर बाळासाहेब होळकर यांच्या कांदा चाळीत पाणी गेल्याने नुकसान झाले आहे.
---
पंचवीस वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या..
कांबी गावात पंचवीस वर्षांपूर्वी अशाच प्रकारे पुराची स्थिती निर्माण होऊन त्यात एसटी बस वाहिली होती. त्यानंतरच येथे पूल बांधण्यात आला होता. आजच्या पुराने पंचवीस वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्याचे ज्येष्ठांनी सांगितले.
----
तीन फोटो आहेत.
०५ कांबी, १, २