पाऊस लांबला; भाजीपाला महागला

By Admin | Updated: June 28, 2014 01:12 IST2014-06-27T23:32:58+5:302014-06-28T01:12:02+5:30

अण्णासाहेब नवथर, अहमदनगर दररोजच्या जेवणातील भाजीपाला चांगलाच महागला आहे़ पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील भाजीपाला करपला असून, आवक घटली आहे़

Rain is far away; Vegetable expensive | पाऊस लांबला; भाजीपाला महागला

पाऊस लांबला; भाजीपाला महागला

अण्णासाहेब नवथर, अहमदनगर
दररोजच्या जेवणातील भाजीपाला चांगलाच महागला आहे़ पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील भाजीपाला करपला असून, आवक घटली आहे़ त्यामुळे भाजीपाल्याच्या महागाईने उच्चांक गाठल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे़ पाऊस न झाल्यास हे दर आणखी वाढतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे़
जूनचा अखेरचा आठवडा सुरू झाला तरी पावसाचा पत्ता नाही़ जिल्ह्यात जून महिन्यांत पाऊस न पडल्याने धरणे व विहिरींनी तळ गाठला आहे़ पिकांना देण्यासाठी पाणी नाही आणि पाऊस नाही़ त्यामुळे नवीन लागवड झाली नाही़ परिणामी आवक एकदम घटली़ मध्यंतरी भाजीपाल्याचे दर घसरले होते़ दर इतके घसरले की भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली होती़ परंतु सध्या बाजारात भाजीपाला येत नाही़ भाजीपाला येण्याचे प्रमाण कमी झाले आहे़ दहा शेतकऱ्यांकडून हा माल जमा करावा लागतो़
पाणी कमी पडल्याने करपलेला भाजीपाला बाजारात येत असून, तो लवकर खराब होतो़ त्यामुळे नासाडी गृहीत धरून किरकोळ विक्रेते भाजीपाला खरेदी करतात़ आवक नाही़ त्यात नासाडी वाढली असून, साठविणे अशक्य आहे़ आवक घटल्यास भाजीपाल्याचे दर आपोआप वाढत असतात़ त्यानुसारच हे दर वाढत असून, भाजीपाला कडाडला आहे़
पाऊस न पडल्यास हे दर आणखी वाढतील,असे भाजीपाला व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे़ शहरासह जिल्ह्यातून होणारी भाजीपाल्याची आवक घटली आहे़ इतर शहरांतून भाजीपाला आवक केल्यास त्याचे दर अधिक असतात़ त्यामुळे तेही परवडत नाही़
सध्या नाशिक जिल्ह्यातून भाजीपाल्याची आवक सुरू आहे़ नाशिक जिल्ह्यातून शिमला मिरची, कारला, दुधी भोपळा, भेंडीची मोठ्याप्रमाणात आवक सुरू असल्याने त्याचे दर न परवडणारे आहेत़ एकूणच पावसाला विलंब झाल्याने आणि मध्यंतरी घसरलेल्या दरामुळे ही आवक घटली असून, भाजीपाल्याचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे़ हे दर आणखी किती वाढतील,याचा अंदाज बांधणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले़
मध्यंतरी भाजीपाल्याचे दर घसरले होते़ त्यामुळे शेतकऱ्यांवर भाजी फेकून देण्याची वेळ आली होती़ त्यामुळे नवीन लागवड झाली नाही़ त्यात आता पाऊस न आल्याने आवक एकदम घटली असून, भाजीपाला कडाडला आहे़ पाऊस न पडल्यास हे दर आणखी वाढतील़ भाव वाढल्याने कुणाचाच फायदा होत नाही़ कारण शेतकऱ्यांकडे जास्त माल आहे, असे नाही़ शेतकऱ्यांकडे अत्यंत कमी भाजीपाला असल्यामुळे त्यांनाही परवडत नाही़ अनेक शेतकऱ्यांकडून भाजीपाला घेऊन तो एकत्र करून किरकोळ व्यापाऱ्यांना विकावा लागतो़ तो विकला न गेल्यास खराब होत असल्याने व्यापाऱ्यांना परवडत नाही़
- सुरेश रेडे, व्यापारी, मार्केटयार्ड
भाजीपाल्याचे भाव वाढलेले नाहीत़ भाव वाढीची अफवा आहे़ कशाचेच भाव वाढले नसून, भाव स्थिर आहेत़ केवळ आवक घटली आहे़ मात्र फार नाही़ त्यामुळे भाव वाढीचा प्रश्नच येत नाही़ महागाई वाढली असून,त्यासोबत भाजीपाला वाढल्याचे सांगितले जाते़
- राजीव बजाज,
मार्केट यार्ड
भाजीपाल्यास मागणी व पुरवठ्याचा अर्थशास्त्राचा नियम लागू पडतो़ मागणी घटली की दर वाढतात, हे काही नवीन नाही़ ही आवक का घटली, ते महत्वाचे आहे़ पाऊस झाला नाही़ म्हणून भाव वाढले आहेत़ पाऊस न पडल्याने भाजीपाला पिकविणे शेतकऱ्यांना अशक्य झाले आहे़ मध्यंतरी दर कमी होते़ भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली़ त्यावेळी शेतकऱ्यांना मोठा तोटा झाला़ सध्या उलट स्थिती निर्माण झाली आहे़
- शिवाजी गायकवाड, मार्केट यार्ड
कमी पाणी दिलेला भाजीपाला बाजारात येत आहे़हा भाजीपाला लवकर खराब होतो़ त्यामुळे दर वाढले आहेत़ त्यात जून महिना संपत आला तरी पाऊस झाला नाही़ त्यामुळे आवक कमी झाली असून, दर वाढले आहेत़ येत्या महिन्यांत पाऊस न झाल्यास दर आणखी वाढतील़
- चंद्रकांत खेत्रे, मार्केट यार्ड
पाऊस न झाल्याने आवक कमी झाली आहे़ बाजारात भाजीपाला येत नाही़ मागणी वाढत आहे़ परंतु पुरवठा होत नाही़ पाणी नसल्यामुळे भाजीपाला महागला असून, ही स्थिती निर्माण झाली आहे़
- सागर खत्रे, मार्केटयार्ड शेतकरी

पाऊस झाला नाही़ पाऊस वेळेवर झाला असता तर लागवड करणे शक्य झाले असते़ परंतु पाऊस वेळेवर न झाल्यामुळे पाणी नाही़ विहिरीतच पाणी नसल्याने पिकांना देणार क ोठूऩ आहे त्या पाण्यात वांग्याचे पीक घेतले असून, पाऊस झाला नाही तर ते जातील़
- उत्तम कुलट, शेतकरी
मागील महिन्यांत भाजीपाल्याचे दर घसरले होते़ परंतु आता माल थोडा आहे़ पण भाव वाढला आहे़ मात्र माल मोठ्याप्रमाणात नसल्यामुळे भाव वाढीचा फायदा होत नाही़ पिकांसाठी लागणारा खर्चही वाढला आहे़ पाऊस नसल्याने नवीन लागवड करावी की नाही, असा संभ्रम आहे़
- श्रीपती सरोदे, शेतकरी
उन्हाळी भाजीपाला जूनमध्ये संपतो आणि नवीन लागवड होत नाही़ त्यामुळे जून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भाजीपाल्याचे दर वाढतात़ पाऊस वेळेवर झाल्यास लवकरच लागवड होऊन आवक वाढते आणि दर कमी होतात़
-अंकुश माने, जिल्हा कृषी अधिकारी
भाजीपाल्याचे भाव मध्यंतरी कमी होते़ परंतु गेल्या आठवड्यापासून दर वाढले आहे़ एकदम भाववाढ झाली आहे़ सर्व भाज्यांचे भाव वाढल्याने नियोजन कोलमडले आहे़
- मधुमती सोनवणे, गृहिणी
दररोज स्वयंपाकाला सुरुवात करताना भाजीपासूनच सुरुवात होते़ परंतु भाजीपाल्याचे भाव एकदम वाढले़ कुठलीही भाजी घ्या १५ रुपये पाव, असा सध्या दर आहे़ भाव कमी होणे गरजेचे आहे़
- विजया केदारी, गृहिणी
आधीच सर्व वस्तू महागल्या आहेत़ त्यात आता भाजीपालाही महागला असून, आठवड्याचे नियोजन कोलमडले आहे़ शंभर रुपयात दोन तीनच भाज्या येतात़
- मेघा खंडेलवाल, गृहिणी
असा येतो भाजीपाला
शहरातील मार्केटयार्डमध्ये शेतकरी सकाळी भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येतात़ व्यापाऱ्यांकडून दहा किलोचा लिलाव करण्यात करण्यात येतो़ लिलावासाठी शहरातील किरकोळ व्यापारी सकाळी दाखल होतात़ व्यापाऱ्यांकडून घेतलेला भाजीपाला किरकोळ विक्रेते शहरातून फिरतात़ तसेच काही चौकात बसूनही भाजी विक्रीचा व्यवसाय करत असून, किरकोळ विक्रेत्यांची शहरात मोठी संख्या आहे़ त्यांच्यामार्फत शहरात भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविला जातो़
दुप्पट दराने भाजी विक्री
व्यापाऱ्यांकडून घेतलेला भाजीपाला किरकोळ विक्रेते ग्राहकांना विकतात़ परंतु भाजीच्या दरात वाढ केली जाते़ भाव वाढीच्या नावाखाली किरकोळ दरावर विक्री करणाऱ्यांकडून जास्ती पैसे घेतल्याने भाजी महाग होत आहे़या किरकोळ व्यापाऱ्यांवर कुणाचाही अंकुश नाही़ त्यामुळे वाट्टेल त्या भावाने भाजीची विक्री होत असल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे़
भाजीपाल्याचे दर
(प्रती दहा किलो)
बटाटा- १८० ते २१०
कांदा- १८० ते २१०
शिमला मिरची- १५० ते २५०
मिरची- १८० ते २००
लसूण- २०० ते ३५०
शेवगा- ५०० ते ७००
भेंडी- २०० ते ४००
फ्लॉवर- ४०० ते ५००
कारले- २५० ते ३५०
आद्रक- ५०० ते ८००
कोबी- १५० ते १६०
लिंबू- १३० ते १४०
टोमॅटो- १०० ते १५०
दुधी भोपळा- ६० ते १००
गवार- ३०० ते ४००
किरकोळ विक्री (एक किलो)
वांगी- ५० ते ६०
टोमॅटो- २० ते २५
बटाटा- २५ ते ३०
लिंबू- १० ते ३०
दोडका- ६० ते ८०
कोबी- १० ते ३०
फ्लॉवर- ६० ते ८०
गवार- ५० ते ६०
लसूण- १०० ते १२०
कांदा- १० ते २८
कोथिंबीर- १५ ते २०
काकडी- ३० ते ४०
दुधी भोपळा- १५ ते २०
शेवगा- ८० ते १००
शिमला मिरची- ४० ते ६०
पालक- १० ते १५
शेपू- १५ ते २०
कारले- ४० ते ६०
मेथी- २० ते २५
मिरची- ४० ते ६०
आद्रक- १० ते २०
भेंडी- ४० ते ६०

भाजीपाल्याचे ठोक विक्रीचे दर (एका जुडीचे भाव)
मेथी - १५ ते १६
कोथिंबीर- १२ ते १५
पालक- ६ ते ८
शेपू- १२ ते १५
चुका- १२ ते १५
करडई- ८ ते १०
बीट- २५
आंबाडी- ८ ते १०
पुदीना- ५ ते ८

Web Title: Rain is far away; Vegetable expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.