राहुरी : येथील एका हॉटेलमध्ये चक्क लहान मुलांना काऊंटरवर बसवून त्यांनाच दारू विक्री करायला लावले जात असल्याचा प्रकार प्रांताधिकारी, तहसीलदारांच्या छाप्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी हॉटेल काकाचे मालक सुनील सुखदेव घुले यास अटक करण्यात आली.
राहुरीचे प्रांतधिकारी डॉ. दयानंद जगताप व तहसीलदार एफ. आर. शेख हे रविवारी वीकएण्ड लाॅकडाऊनची पाहणी करीत असताना राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथे हाॅटेल काका या ठिकाणी दारू विक्री केली जात असल्याचे लक्षात आले. या हॉटेलची तपासणी केली हॉटेल मालकाने शासकीय नियम मोडून हॉटेल सुरू केल्याचे आढळले. तसेच हॉटेलच्या गल्ल्यावर लहान मुलांना बसवून दारू विक्री करीत असल्याचे आढळून आले. ते पाहून तहसीलदार शेख यांचा चांगलाच पारा चढला. त्यांनी हॉटेल मालक घुले यास फैलावर घेत पैशासाठी लहान मुलांच्या जीवाशी खेळू नका, लहान मुलांना दारू धंद्यावर बसविताना लाज वाटत नाही का, असा सवाल केला. त्यानंतर हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हॉटेलमधून दिवसभर दारू विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर शेख यांनी हॉटेलमधील दारू जप्त करीत पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना मोबाईलद्वारे संपर्क साधून घटनास्थळी बोलावून घेतले. हॉटेलमध्ये तिघेजण दारू पिताना आढळून आले. राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक धवल गोलेकर, उके, नेहुल हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हॉटेलमधील दारू जप्त करून हाॅटेल मालकास ताब्यात घेतले. हॉटेल सुरु ठेवल्याप्रकरणी घुले यास तहसीलदारांनी २ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.