राहुल झावरे-सुजित झावरे एकाच व्यासपीठावर
By Admin | Updated: August 19, 2014 23:27 IST2014-08-19T23:04:55+5:302014-08-19T23:27:46+5:30
पारनेर: जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल झावरे व राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे हे प्रथमच एका व्यासपीठावर आले

राहुल झावरे-सुजित झावरे एकाच व्यासपीठावर
पारनेर: नंदकुमार झावरे व वसंतराव झावरे यांचे गेल्या नऊ वर्षांत वितुष्ट असल्याने त्यांचे दोन्ही सुपुत्र कधीही एकत्र आले नाहीत. मात्र मंगळवारी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल झावरे व राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे हे प्रथमच एका व्यासपीठावर आले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर मतदारसंघातील नवी राजकीय कलाटणी म्हणूनही या घडामोडीकडे पाहिले जात आहे.
काँग्रेस नेते नंदकुमार झावरे व राष्ट्रवादीचे नेते वसंतराव झावरे या दोन माजी आमदारांमध्ये विळया-भोपळयाचे नाते आहे. वसंतराव झावरे यांचा २००४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव करून विजय औटी यांना आमदार करण्यात नंदकुमार झावरे ‘किंगमेकर’ ठरले. नंतर वसंतराव झावरे यांनी नंदकुमार झावरे यांच्याशी जुळवून घेताना सुजित झावरे यांचे जिल्हा परिषदेत यश पदरात पाडून घेतले तर जिल्हा बँकेत पुन्हा नंदकुमार झावरे यांचा पराभव करून जुना हिशेबही चुकता केला. त्यानंतर दोघांत वितुष्ट कायम आहे. या वितुष्टामुळे राष्ट्रवादी व काँग्रेस पारनेर तालुक्यात मित्रपक्ष असूनही एकमेकांचे कट्टर स्पर्धक म्हणूनच पाहतात. यामुळे त्यांचे सुुपुत्र सुजित झावरे व राहुल झावरे यांनीह एकत्र येणे टाळले.दोघे एकत्र येत नसल्याने सेनेचे आमदार विजय औटी हे आम्हाला सापत्नपणाची वागणूक देतात असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.
निघोजचे सरपंच संदीप वराळ, राष्ट्रवादीचे उमेश सोनवणे,सोमनाथ वरखडे यांनी दोन्ही युवा झावरे यांना हा प्रकार सांगितला. दोन्ही काँग्रेसने एकत्र यावे अशी मागणी त्यांनी लावून धरली. राहुल आणि सुजित या दोघांकडूनही होकार आल्यानंतर मंंगळवारी विविध कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने निघोज येथे राहुल झावरे व सुजित झावरे यांच्यासह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. भास्कर शिरोळे व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पोपट पवार, राहुल शिंदे, शैलेंद्र औटी, संदीप सालके, दीपक नाईक हे सर्व नेते एका व्यासपीठावर आले.
उपस्थितांनीही भाषणातून दोन्ही काँग्रेसने व दोन्ही झावरे यांनी एकत्र रहावे, अशी साद घातली. यात संदीप वराळ, सुजित झावरे, डॉ. शिरोळे यांनी आमदार औटी यांच्यावर कडाडून टीका केली. झावरेद्वयींनीही भविष्यात किमान विकासकामांसाठी एकत्र येऊन लढा देऊ असे सांगितले. पारनेरच्या राजकारणात युवा पिढीचे नवे राजकारण सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. (तालुका प्रतिनिधी)