मुळाचे बंधारे कोरडेठाक
By Admin | Updated: October 21, 2014 00:59 IST2014-10-21T00:40:39+5:302014-10-21T00:59:16+5:30
राहुरी : मुळा नदीवर बांधण्यात आलेले चारही बंधारे कोरडेठाक पडले आहेत़ पाटबंधारे खात्याने सप्टेबर व आॅक्टोबरमध्ये पाणी सुरू असताना फळ्या टाकल्या नाहीत़

मुळाचे बंधारे कोरडेठाक
राहुरी : मुळा नदीवर बांधण्यात आलेले चारही बंधारे कोरडेठाक पडले आहेत़ पाटबंधारे खात्याने सप्टेबर व आॅक्टोबरमध्ये पाणी सुरू असताना फळ्या टाकल्या नाहीत़ त्यामुळे बंधाऱ्यात पाणी साचले नाही. परिणामी आता बंधारे कोरडे झाल्याने विहिरींची पाणीपातळी खाली गेली आहे़
मुळा धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते़ त्यावेळी पाटबंधारे खात्याकडे फळ्या टाकण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती़ मात्र पाऊस होणार असल्याने फळया टाकता येणार नाही, असे पाटबंधारे खात्याने शेतकऱ्यांना सांगितले़
त्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली़ दरम्यान डिग्रस, मांजरी, मानोरी व तिळापूर हे मुळा नदीवरील बंधारे कोरडेठाक पडले़
यंदा मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही़ मागील महिन्यात मुळा धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते़ मात्र बंधाऱ्यांमध्ये फळया न टाकल्याने पाणी अडविले गेले नाही़ आॅक्टोबरअखेर पाणी नसल्याने मुळा नदीकाठावरील शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़
मुळा नदीपात्रात पाणी सोडून डिग्रस, मांजरी, मानोरी व तिळापूर हे बंधारे भरण्यात यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़ नदीपात्रातील वाळू मोठ्या प्रमाणावर उपसल्याने नदीत पाणी कमी झिरले. त्यामुळे आता विहिरींच्या पाण्याची पातळी खोल गेली आहे़ विजेच्या लपंडावाबरोबरच पाणी नसल्याने शेतकऱ्यांचे लक्ष मुळा धरणातील पाण्याकडे वेधले आहेत़
(तालुका प्रतिनिधी)