संगमनेर तालुक्यात रॅपिड अँटिजेन किटचे रॅकेट?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:21 IST2021-05-07T04:21:29+5:302021-05-07T04:21:29+5:30
संगमनेर : कोरोनाग्रस्त संशयित रुग्णांचे तातडीने निदान होण्याकरिता रॅपिड अँटिजेन किट उपयुक्त ठरत आहेत. या किटद्वारे केवळ शासकीय रुग्णालयांमध्ये ...

संगमनेर तालुक्यात रॅपिड अँटिजेन किटचे रॅकेट?
संगमनेर : कोरोनाग्रस्त संशयित रुग्णांचे तातडीने निदान होण्याकरिता रॅपिड अँटिजेन किट उपयुक्त ठरत आहेत. या किटद्वारे केवळ शासकीय रुग्णालयांमध्ये चाचणी करण्यासाठी मान्यता आहे. मात्र, बुधवारी (दि. ५) तालुक्यातील साकूरमधील दोन रुग्णालयांवर कारवाई करत असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांना एका रुग्णालयात रॅपिड ॲण्टिजन किट आढळून आल्या. कोरोनाग्रस्त संशयित रुग्णांची अवैधरित्या चाचणी होत असल्याचे या कारवाईतून समोर आल्याने तालुक्यात रॅपिड ॲण्टिजन किटचे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विनापरवाना कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असलेले व कोरोनाग्रस्त संशयित रुग्णांची अवैधरित्या रॅपिड ॲण्टिजन किटद्वारे चाचणी करत त्यांच्यावर उपचार होत असलेल्या साकूर येथील दोन रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली. ही दोन्ही रुग्णालये सध्या सील आहेत. संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी ही कारवाई केली.
डॉ. अविनाश रासने यांच्या समर्थ हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णावर उपचार सुरू होते. कोरोना रुग्णांवर उपचार करण्याबाबत कुठलीही परवानगी या रुग्णालयाकडे नव्हती. तसेच साकूर येथीलच डॉ. संजय टेकुडे यांच्या ओम साई रुग्णालयातही १७ रॅपिड अँटिजेन किट व कोरोनासंबंधी औषधसाठा आढळून आला.
डॉ. टेकुडे यांच्या रुग्णालयात अवैधरित्या रॅपिड ॲण्टिजन किटचा वापर करत कोरोनाग्रस्त संशयित रुग्णांची चाचणी करण्यात येत होती. त्यांच्याकडे या किट कोठून आल्या, याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. रुग्णाची अवैधरित्या चाचणी केल्यानंतर तो पॉझिटिव्ह आला असता त्याची कुठलीही नाेंद शासकीय आकडेवारीत होत नाही. त्यामुळे अशा प्रकारे आतापर्यंत अवैधरित्या अनेक रुग्णांची चाचणी झालेली असू शकते. त्यापैकी ज्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असेल अशा अनेक रुग्णांच्या नोंदीदेखील प्रशासनाकडे उपलब्ध नसतील. तसेच कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नाही. त्यामुळे एकूणच हा प्रकार कोरोनाचा संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरणारा आहे. ही संख्या मोठी असण्याची शक्यता आहे. साकूरप्रमाणे तालुक्याच्या इतरही भागात रॅपिड अँटिजेन किटद्वारे अवैधरित्या चाचणी होणाऱ्या ठिकाणी आरोग्य विभागाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
--------------
योग्य उपचार न मिळाल्याने रुग्ण गंभीर
कोरोना व कोरोना सदृश इतर आजारांची लक्षणे आढळून येणाऱ्या ग्रामस्थांची कोरोना तपासणी करणे बंधनकारक आहे. असे रुग्ण गावांतील डॉक्टरांकडे जातात. अनेकदा मेडिकलमध्ये तात्पुरत्या स्वरूपात गोळ्या, औषधे घेतात. काही डॉक्टरही त्यांच्या घरी जाऊन त्यांना सलाईन देत औषधोपचार करतात. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने ते गंभीर होण्याचे प्रकार घडले आहेत, अशा डॉक्टर, मेडिकलवर कारवाई करण्याचे निर्देश संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दिले होते.
.................
--------------
साकूरमधील डॉ. संजय टेकुडे यांच्या ओम साई रुग्णालयात १७ रॅपिड अँटिजेन किट व कोरोनासंबंधी औषधसाठा कारवाई दरम्यान आढळून आला. रुग्णांची रॅपिड अँटिजेन किटने चाचणी करताना त्याची नोंद आयसीएमआर पोर्टलवर करावी लागते. डॉ. टेकुडे हा या पोर्टलवर नोंदणी न करता अवैधरित्या चाचणी करत होता. त्यामुळे पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची नोंद प्रशासनाकडे नाही. त्या संदर्भाने कारवाई करण्याच्या सूचना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार योग्य ती कारवाई होईल.
-डॉ. शशिकांत मंगरुळे, प्रांताधिकारी, संगमनेर उपविभाग