किरकोळ कारणातून कोल्हारमध्ये दगडफेक

By Admin | Updated: June 12, 2014 00:06 IST2014-06-11T23:30:25+5:302014-06-12T00:06:50+5:30

कोल्हार : किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीचे पर्यावसन दोन गटांत दगडफेक व हाणामारीत झाल्याने बुधवारी कोल्हारमध्ये तणाव निर्मााण झाला.

Racket in the coalberger for minor reasons | किरकोळ कारणातून कोल्हारमध्ये दगडफेक

किरकोळ कारणातून कोल्हारमध्ये दगडफेक

कोल्हार : किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीचे पर्यावसन दोन गटांत दगडफेक व हाणामारीत झाल्याने बुधवारी कोल्हारमध्ये तणाव निर्मााण झाला. पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीमार केला, तर दगडफेकीत चौघेजण जखमी झाले. याप्रकरणी ५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोल्हार येथे गाडी मागे घेण्याच्या कारणावरून दोन महिलांशी झालेल्या बाचाबाचीतून अब्दुल मुनीर पिंजारी याने राहुल अर्जुन खर्डे यास मारहाण केली. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे खर्डे समर्थकांनी पोलीस दूरक्षेत्रात जाऊन आरोपीस अटक होईपर्यंत ‘गाव बंद’ ठेवण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, बुधवारी सकाळी ‘गाव बंद’चे आवाहन करण्यात आले. परंतु तरीही काही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्यास प्रारंभ केल्याने जमावाने त्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. एकजणाने त्यास विरोध केल्याने जमाव व त्याच्यात बाचाबाची झाली. त्यातून परिस्थिती आणखीच चिघळली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमाव पांगविण्यासाठी लाठीमार केला. त्यात अनेकजण जखमी झाले. त्यानंतर दोन गटांत जोरदार दगडफेक झाली. त्यात नितीन अच्युत खर्डे, अभय नंदकिशोर खर्डे, रोहित रविंद्र खर्डे, विरेंद्र शाम गोसावी हे चार युवक जखमी झाले. त्यांना प्रवरा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गावात जमावबंदी लागू करण्यात आली. सायंकाळी परिस्थिती नियंत्रणात आली, मात्र तरीही खबरदारी म्हणून राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान गावातील वाढत्या गुंडगिरीच्या निषेधार्थ पोलिसांना निवेदन देऊन दिवसभर ‘गाव बंद’ ठेवण्यात आला. संबंधीत आरोपीस अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांना अवैध धंदे बंद करण्याबाबत निवेदन दिल्यानंतर ग्रामदैवत भगवती माता मंदिरात झालेल्या बैठकीत पोलिसांच्या लाठीमाराचा निषेध करण्यात आला. गावातील वाढती गुंडगिरी व अवैध धंदे रोखण्यासाठी यापूर्वीही सहायक पोलीस निरीक्षक देविदास पवार यांना निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याबद्दल डॉ. भास्करराव खर्डे यांनी नापसंती व्यक्त करून कोल्हार-भगवतीपूर गावची संयुक्त ग्रामसभा बोलाविण्यात येणार असून, एकजुटीने निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
माजी सरपंच सुरेंद्र खर्डे यांनी गावातील पोलीस दूरक्षेत्र बंद असून, पोलिसांचे गुंडांना संरक्षण व सर्वसामान्यांना त्रास या धोरणामुळे असंतोष निर्माण झाला असून पोलिसांचा वचक राहिला नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. कोल्हार बुद्रुकचे सरपंच डॉ. संजय खर्डे यांनी याबाबत ग्रामसभा बोलावणार असल्याचे सांगितले.
(वार्ताहर)

Web Title: Racket in the coalberger for minor reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.