उमेदवारी माघारीसाठी धावपळ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:39 IST2021-02-05T06:39:47+5:302021-02-05T06:39:47+5:30

अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी उमेदवारांशी संपर्क साधला जात आहे; मात्र अनेकांचे फोन ...

The race for withdrawal of candidature started | उमेदवारी माघारीसाठी धावपळ सुरू

उमेदवारी माघारीसाठी धावपळ सुरू

अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी उमेदवारांशी संपर्क साधला जात आहे; मात्र अनेकांचे फोन बंद असल्याने नेत्यांचीही अडचण झाली असून, उमेदवारी मागे घेण्याबाबतच्या नोटिसीवर स्वाक्षरी आणण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. त्यामुळे कोण माघारी घेणार आणि कुणाचा मार्ग सुकर होणार, याची जिल्ह्याला उत्सुकता आहे.

विकास सहकारी संस्था मतदारसंघ वगळता बिगरशेती, महिला राखीव, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि शेतीपूरक मतदारसंघातून सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून तालुक्यातील बड्या नेत्यांचे अर्ज आहेत. या नेत्यांकडून बिनविरोधसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांवर दबाव आणला जात आहे. त्यामुळे काहींनी आपले फोन बंद करून ठेवले आहेत. त्यामुळे उमेदवारांशी संपर्क करणे कठीण झाले आहे. तसेच काहीजण पसार झाल्याने त्यांचा शोध कार्यकर्त्यांकडून घेतला जात आहे. उमेदवारी मागे घेण्याबाबतची नोटीस असते. या नोटिसा उपनिबंधक कार्यालयातून नेण्यात आल्या आहेत. उमेदवारांचा शोध घेऊन त्यांची स्वाक्षरी मिळविण्यासाठी धावपळ सुरू आहे. बिगरशेती मतदारसंघातून एका जागेसाठी ५० उमेदवारी अर्ज दाखल आहेत. या मतदारसंघातून आमदार अरुण जगताप, संग्राम जगताप, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी आमदार पाडूरंग अभंग हे बडे नेते रिंगणात आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून अर्ज मागे घेण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे. महिला राखीव मतदारसंघातून एकूण ४३ अर्ज दाखल आहेत. या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या पत्नी चैताली काळे, अनुराधा नागवडे, रत्नमाला लंघे, सुनीता राजेंद्र कोठारी या बड्या कुटुंबातील महिलांचे अर्ज दाखल आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गातून एकूण ४६ अर्ज दाखल आहेत. या मतदारसंघातही चुरस आहे. या मतदारसंघातून अण्णासाहेब शेलार, भानुदास मुरकुटे, करण ससाणे, भगवान फुलसौंदर, विठ्ठल लंघे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले असून, या मतदारसंघात उमेदवारी माघारीसाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून माजी आमदार वैभव पिचड, खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव डॉ. चेतन अशोक भांगरे यांनीही अर्ज दाखल केले असून, या मतदारसंघातही चुरस आहे.

....

विकास सहकारी संस्था मतदारसंघाकडे लक्ष

विकास सेवा सहकारी मतदारसंघातील १२ जागांपैकी कोपरगाव, पाथर्डी, श्रीगोंदा तालुक्यात बिनविरोधसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यातील काहींनी इतर मतदारसंघातून अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामुळे विकास सेवा सहकारी मतदारसंघातून दाखल केलेले अर्ज त्यांच्याकडून मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघातून कोण माघार घेणार,याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

Web Title: The race for withdrawal of candidature started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.