मेळाव्यातून जाणले तरुणांचे प्रश्न
By Admin | Updated: August 3, 2014 01:09 IST2014-08-02T23:53:43+5:302014-08-03T01:09:39+5:30
नेवासा : तालुक्यातील युवकांना संघटित करून तालुका विकासास गती देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे.

मेळाव्यातून जाणले तरुणांचे प्रश्न
नेवासा : तालुक्यातील युवकांना संघटित करून तालुका विकासास गती देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. युवकांची संघटित शक्तीच तालुक्याला उज्ज्वल भवितव्य प्राप्त करून देईल, असा विश्वास आमदार शंकरराव गडाख यांनी नेवासा फाटा येथे आयोजित युवक मेळाव्यात बोलताना व्यक्त केला. तालुका विकासाचे शिवधनुष्य पेलण्यासाठी युवा शक्तीने माझ्या पाठिशी उभे रहावे, असे भावनीक आवाहनही त्यांनी यावेळी केले.
नेवासा फाटा येथील थावरे मैदानाच्या प्रांगणात झालेल्या युवक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठलराव लंघे हे होते. तर जि. प. सदस्य सुनील गडाख, राष्ट्रवादी युवकचे गणेश गव्हाणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र उंदरे यांच्यासह आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मेळाव्याच्या प्रसंगी युवकांशी सुसंवाद साधताना आ.गडाख पुढे म्हणाले, मेळाव्यातील युवक हा विकासाच्या कामाकरिता एकत्रीत आला आहे. तालुक्यातील विविध प्रश्न व अडचणी सोडवायच्या असतील तर युवक संघटित केला पाहिजे म्हणून एका वर्षापासून मी हे प्रयत्न केले आहे. संघटित युवा शक्तीच्या जोरावरच मी तालुका विकासाचे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्र मंडळाच्या फलकांच्या उद्घाटनप्रसंगी भाषणे न करता युवकांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न मी केला आहे. त्यांच्या समस्या म्हणून अडचणी मी समजून घेतल्या आहेत आणि त्यादृष्टीने त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे.
नेवासा तालुका तीन धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. हक्काचे पाण्यासाठी वेळोवेळी संघर्ष करून दोनदा पाणी मिळवून दिले आहे. उन्हाळ्यात पाणी मिळवून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मला संघर्ष करावा लागला आहे. या तालुक्यातील शेतीला दोनदा पाणी देऊनही मला विरोधक बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. तरीही मी विरोधकांबद्दल ‘ब्र’ शब्द काढणार नाही. जिल्ह्यातील कावेबाज पुढारी विरोधकांचे धनी आहेत. पाटपाण्याबाबत जो कोणी आडवे येईल, त्याला मी आडवे केल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी माझी आग्रही मागणी आहे. मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्रही पाठविले आहे. या तालुक्यात मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे लोक आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे माझ्यासह यावे, त्यांच्याशी खुली चर्चा करून आरक्षणाबाबत आग्रही मागणी करू. केंद्राकडे हा प्रस्ताव पाठविण्याची विनंती करू, असे त्यांनी स्पष्ट केले. विठ्ठलराव लंघे म्हणाले, आ़ गडाख यांच्याबरोबर मी विकास प्रक्रियेत सहभागी झालो. तालुक्यासाठी नेतृत्वाला जपायचे आहे. हे काम तुम्हाला व आम्हाला मिळून करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.जि.प.च्या माध्यमातून तालुक्याला जास्तीत जास्त निधी आ. गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. सूत्रसंचालन साहित्यिक नामदेवराव देसाई यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
विरोधकांवर टीका
आ. गडाख म्हणाले की, वाईट बोलून, शिव्या देऊन, खोटे बोलून, मौत, दहावे कार्यक़्र मांना उपस्थित राहून मते मिळविता येतात. मात्र जनतेचे प्रश्न हाती घेतले नाही. त्यांच्या समस्या सोडविल्या नाही तर तो पुढारी वांझ होऊ शकतो, असे सांगून मला वांझ व्हायचे नाही, असे स्पष्ट करताच युवकांच्या जनसागरातून टाळ्यांचा कडकडाट झाला.
आरक्षणात पिचडांनी राजकारण करु नये
पालकमंत्री मधुकरराव पिचड यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध करून राजकारण करू नये. पिचड साहेबांना विनंती आहे की, महाराष्ट्र शासनाला पत्र पाठवून हा प्रस्ताव वर कसा पाठविला जाईल यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन करून घरचा आहेर दिला.
धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणून धनगर समाजाच्या वतीने आ. गडाख यांचा सत्कार करण्यात आला. जनसमुदायातून काही युवकांनी आमचा सत्कार खाली येऊन स्वीकारा असे आवाहन करताच आ. गडाख यांनी युवकांच्या घोळक्यात जाऊन सत्कार स्वीकारला.