गोदापात्राचे लोकसहभागातून शुध्दीकरण
By Admin | Updated: June 15, 2016 23:46 IST2016-06-15T23:38:58+5:302016-06-15T23:46:15+5:30
नेवासाफाटा : नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम-टोका येथील श्री सिद्धेश्वर मंदिर घाटावरील गोदा पात्रातील सुमारे अडीच हजार ट्रॉली इतका गाळ काढून शुद्धीकरण करण्यात आले.

गोदापात्राचे लोकसहभागातून शुध्दीकरण
नेवासाफाटा : नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम-टोका येथील श्री सिद्धेश्वर मंदिर घाटावरील गोदा पात्रातील सुमारे अडीच हजार ट्रॉली इतका गाळ काढून शुद्धीकरण करण्यात आले. शासनाची मदत न घेता लोकसहभागातून ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत गोदानदी पात्राचे पंचवीस फूट खोलीकरण झाले. अवघ्या दहा दिवसाच्या कालावधीत ही मोहीम राबविण्यात आली.
श्री सिध्देश्वर मंदिर परिसर पेशवाईचे प्रवेशद्वार समजले जाते. जायकवाडी धरणाच्या निर्मितीमुळे गोदावरी प्रवरासंगम- टोका हा भाग जायकवाडी जलाशयाचा शेवटचा भाग आहे. जायकवाडी धरणाच्या निर्मितीनंतर सदरचे घाट पाण्याखाली तर दुष्काळस्थितीत गाळाखाली गाडले गेले होते. जायकवाडी धरणाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याने व पन्नास वर्षानंतर गोदावरीचे पात्र कोरडे झाल्याने पुरातन घाट गाळाखाली गेल्याचे निदर्शनास आले.
श्री सिध्देश्वर देवस्थानचे महंत बालब्रम्हचारी महाराजांनी सदर घाटाचे पुनर्जीवन करण्याचे ठरविले. त्यांनी ही बाब भाजपाचे नगर जिल्हाचिटणीस नितीन दिनकर यांच्याकडे बोलून दाखविली. त्यानंतर आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी या भागाची पाहणी केली. या कामासाठी शासकीय निधी अथवा कोणतीही योजना मिळणे कठीण असल्याने हे काम लोकवर्गणी व श्रमदानातून करण्याचे ठरले. यासाठी परिसरातील नागरिक व ग्रामस्थांनी लोकवर्गणीसह श्रमदान केले. आ. मुरकुटे, नितीन दिनकर, काँग्रेसचे संजय सुखधान, शिवसेनेचे पप्पू परदेशी यांनी यंत्रसामुग्री दिली. कैलास खंडागळे, ज्ञानेश्वर डावखर, राजेंद्र सुडके, बाळासाहेब डावखर, भाऊसाहेब मते, रमेश गाढे, रमेश गंगुले, शिवाजी बर्डे, रमेश गोर्डे यांनी आठ दिवसात दोन कि. मी. रुंद व वीस फुट खोल नदीपात्रातील गाळ काढला. (वार्ताहर)