शुद्ध पाणी.. स्वच्छ जिल्हा
By Admin | Updated: November 6, 2014 14:43 IST2014-11-06T14:43:00+5:302014-11-06T14:43:00+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेल्या दक्षता व सनियंत्रण समितीच्या सभेत खासदार दिलीप गांधी यांनी शुद्ध पाणी आणि स्वच्छ जिल्हा करण्याबाबत सूचना संबंधित अधिकार्यांना केल्या.

शुद्ध पाणी.. स्वच्छ जिल्हा
अहमदनगर: जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेल्या दक्षता व सनियंत्रण समितीच्या सभेत खासदार दिलीप गांधी यांनी शुद्ध पाणी आणि स्वच्छ जिल्हा करण्याबाबत सूचना संबंधित अधिकार्यांना केल्या. नगर जिल्हा स्वच्छ आणि सुंदर बनविण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या सूचना प्रशासनासाठीदेखील आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा नियोजनभवन येथे खा. दिलीप गांधी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता व सनियंत्रण समितीची सभा झाली. सभेला शहरासह जिल्ह्यातील आमदारांनी मात्र दांडी मारली. एकमेव आमदार बाळासाहेब मुरकुटे उपस्थित होते. खा. सदाशिव लोखंडे यांनी उशिराने का होईना पण हजेरी लावली. जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा गुंड, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच कवडे यांनी जिल्ह्यात ७६ टक्के पाऊस झाल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, त्यादृष्टीने दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर पाझर तलावांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करा, अशा सूचना देत मागील युपीएच्या काळातील झालेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी झाली असती तर आज राज्य टँकरमुक्त झाले असते, असे सांगून गांधी यांनी पाणीटंचाईचे खापर आघाडी सरकारवर फोडले.
जिल्ह्यात राष्ट्रीय स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविले जाणार आहे. अधिकार्यांनी प्रत्यक्ष काम करावे, पाणी व स्वच्छतेच्या कामात कसूर केल्यास गय केली जाणार नाही, असे सांगून गांधी यांनी मुंगी येथील पाणी योजनेवरून अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. पाथर्डी येथील अस्वच्छतेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. पाथर्डी शहर बकाल झाले आहे. स्वच्छता शून्य आहे. येत्या रविवारपर्यंत शहर स्वच्छ करा, अशी तंबी गांधी यांनी यावेळी अधिकार्यांना दिली. प्रत्येक गावात जावून तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी आहे, कचर्याचे निर्मूलन कसे केले जाते, शौचालयांची काय स्थिती याची माहिती घेण्याच्या सूचना गांधी यांनी केल्या. नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यावर शासनाचा भर असून, त्यासाठी विविध योजना राबविल्या जातील. पाणी व स्वच्छतेच्या योजनांची केंद्रांकडून घोषणा होईल, त्या योजना जिल्ह्यात राबविण्यावर भर राहणार आहे. योजना राबविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची साथ आवश्यक असून, नगर जिल्हा स्वच्छ आणि सुंदर करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला.
जिल्ह्यात केवळ शौचालये उभारून चालणार नाही. कारण अनेक ठिकाणी शौचालये आहेत पण पाणी नाही. त्यामुळे शौचालयांत कमालीची दुर्गंधी निर्माण झालेली आहे. त्यासाठी सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी इंधन विहीर घेऊन पाण्याची टाकीही देणे आवश्यक आहे, हे सर्व केंद्राच्या योजनेत करण्याची मागणी करत खा. लोखंडे यांनी शिर्डीत अशीच बैठक घ्या, अशी मागणी खा. गांधी यांच्याकडे केली. नगर शहरात सर्वत्र कचरा साचला आहे. त्याकडे कुणाचेच लक्ष नाही. डांबरात गवत कसे उगवते, असा सवाल उपस्थित करत गांधी यांनी शहरातील रस्त्यांवर नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
--------------
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार खा. गांधी यांनी शेवगाव तालक्यातील कांबी हे गाव दत्तक घेतले आहे. या गावचा सूक्ष्म विकास आराखडा तयार केला जाणार आहे. गावातील शेण, कचरा, सांडपाणी, वीज, यासारखे प्रश्न सोडविले जाणार आहेत. शासनाच्या योजना गावात प्रभावीपणे राबविल्या जाणार आहेत. हे गाव एका वर्षात आदर्श गाव बनविले जाणार असून, दरवर्षी असे एक गाव दत्तक घेण्यात येईल, असे गांधी यांनी सांगितले. दक्षता समितीच्या बैठकीत बोलताना दिलीप गांधी, जिल्हाधिकारी अनिल कवडे, सीईओ शैलेश नवाल, मंजुषा गुंड जिल्ह्यातील स्वच्छतेची स्थिती अत्यंत वाईट आहे. साथीचे रोग पसरले आहेत. त्यावर उपाययोजना करण्यात येणार असून, जनजागृती करावी लागेल. लोकप्रतिनिधींकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. त्यांच्यामार्फत स्वच्छतेबाबत प्रत्येक गावात जनजागृती करता येईल.
-अनिल कवडे, जिल्हाधिकारी
■ शाळा परिसरातील वीज खांब हटविण्याच्या सूचना
■ ज्याला नाही घर त्याला घर देणार
■ प्रत्येक गावाला शुद्ध पाणीपुरवठा
■ प्रत्येक गावात शौचालये उभारणार
■ साथीच्या रोगांना आळा घालणार
■ शहरात ९ जणांची समिती स्थापणार