अंगणवाडीतील मुलांच्या बौद्धिक विकासासाठी करणार खेळणी खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:30 IST2021-02-26T04:30:44+5:302021-02-26T04:30:44+5:30
बुधवारी जिल्हा परिषदेत समितीची मासिक सभा झाली. त्यात विविध विषयांवर चर्चा करून साहित्य खरेदीचा निर्णय झाला. बाल्यावस्था ही मानवी ...

अंगणवाडीतील मुलांच्या बौद्धिक विकासासाठी करणार खेळणी खरेदी
बुधवारी जिल्हा परिषदेत समितीची मासिक सभा झाली. त्यात विविध विषयांवर चर्चा करून साहित्य खरेदीचा निर्णय झाला. बाल्यावस्था ही मानवी विकासाच्या अवस्थेमध्ये महत्त्वाची अवस्था आहे. या टप्प्यात बालकांचा बौद्धिक विकास होणे गरजेचे असते. बालकांच्या आवडीनिवडी जोपासून त्यांना तसे घडवणे गरजेचे असते. मुलांच्या बौद्धिक विकास होण्यासाठी बौद्धिक विकासाची खेळणी खरेदी करून, तसेच त्या अनुषंगाने अंगणवाडीसेविकांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. बालकांच्या मूलभूत सुधारणा कार्यक्रमांतर्गत प्रायोगिक तत्त्वावर असा उपक्रम कर्जत-जामखेडमध्ये राबविण्यात आला आहे. त्यात इतर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यासाठी हा उपक्रम राबविण्यासाठी प्रत्येकी ५३ लाख रुपये निधीची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे करण्याचे समितीत ठरले.
याशिवाय सेस निधीतून अंगणवाड्यांना सतरंजी, बस्करपट्टी पुरण्यासाठी ३० लाख रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. सेसमधूनच पाचवी ते दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींना सायकल पुरविण्यासाठी ३० लाख, तर ग्रामीण भागातील अपंग महिलांना शिलाई मशीन पुरवण्यासाठी ९ लाख रकमेसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
सभेसाठी सभापती मीरा शेटे यांच्यासह सदस्य रोहिणी निघुते, सुनीता भांगरे, राणी लंके, अनुराधा नागवडे, पुष्पा रोहोम, बेबी सोडनर, पौर्णिमा जगधने, तसेच समितीचे सदस्य सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम आदी उपस्थित होते.
-------------------
पावणेतीन कोटींच्या सॅनिटरी नॅपकिन
विशेष घटक योजनेंतर्गत महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी नॅपकिन पुरवण्यासाठी २ कोटी ८३ लाख रुपयांच्या रकमेची तरतूद करण्यात आली. याशिवाय आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी अंगणवाड्यांना डिजिटल लर्निंग किट व अंगणवाड्यांना किराणा माल ठेवण्यास भांडी पुरण्यासाठी ३० व २० लाख रुपयांच्या योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.