सावकराचे खरेदी खत ठरवले अवैध
By Admin | Updated: April 14, 2017 17:04 IST2017-04-14T17:04:34+5:302017-04-14T17:04:34+5:30
मुलीच्या लग्नासाठी वाकी येथील शेतकरी अशोक सोरटे यांनी कर्ज घेण्यासाठी एक हेक्टर जमिनीचे खरेदीखत परत सोडवण्याच्या बोलीवर सावकाराला दिले.

सावकराचे खरेदी खत ठरवले अवैध
ज मखेड(अहमदनगर): मुलीच्या लग्नासाठी वाकी येथील शेतकरी अशोक सोरटे यांनी कर्ज घेण्यासाठी एक हेक्टर जमिनीचे खरेदीखत परत सोडवण्याच्या बोलीवर सावकाराला दिले. ३६ टक्के व्याजदराने पैसे देऊनही सावकाराने त्रयस्थ व्यक्तीला ती शेतजमीन सात वर्षांनी विकली. एका सामान्य शेतकºयाने सावकाराविरोधात पुरावे जमा करून जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली. जिल्हा उपनिबंधकांनी या तक्रारीवर निकाल देत सावकाराने नावावर करून घेतलेले खरेदीखत अवैध ठरवत मालकी हक्कासह अभिहस्तांतरण करण्याचा आदेश दिला. शेतकरी सोरटे यांनी परवानाधारक सावकार भारतलाल खिंवसरा यांच्याकडून कर्ज घेतले होते. ते कर्ज ३६ टक्के व्याजदराने फेडले. तरीही शेतजमीन सावकाराने परत दिली नाही. उलट जमिनीची विक्री केली. कर्जाच्या रकमेसाठी जमिनी गहाण ठेवण्याऐवजी सावकार शेतकºयांचा जमिनी नावावर करून घेत असल्याची तक्रार तत्कालीन जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांच्याकडे ४ आॅगस्ट २०१४ रोजी सोरटे यांनी केली होती. हौसारे यांनी आपल्या कार्यालयात वेळोवेळी सुनावणी घेतल्या होत्या. जिल्हा उपनिबंधक हौसारे यांनी त्यावर जामखेड येथील सहायक निबंधक अनिल गायकवाड यांना चौकशीचा आदेश करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. सहायक निबंधक अनिल गायकवाड यांनी २३ डिसेंबर २०१५ रोजी जिल्हा उपनिबंधकांकडे अहवाल सादर केला. सदर अहवालात त्यांनी परवानाधारक सावकार खिंवसरा सावकारकीच्या ओघात स्थावर मालमत्ता संपादित करीत आहेत. याबाबत शेतजमिनीचे खरेदीखत व कालांतराने परत दिल्याचे पुरावे आहेत. तालुका उपनिबंधक गायकवाड यांच्या अहवालानुसार जिल्हा उपनिबंधक हौसारे यांनी ५ जानेवारी २०१६ रोजी सहायक निबंधक गायकवाड यांना पत्रव्यवहार करून बेकायदेशीर सावकारकी आढळून येत असल्यास तत्काळ गुन्हा दाखल करावा व या कार्यालयाला सदर प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. जिल्हा उपनिबंधकांकडील सुनावणीदरम्यान तक्रारदार सोरटे यांनी परवानाधारक सावकाराचे कार्यक्षेत्र खर्डा व परिसरापर्यंत मर्यादित आहे. तरीही त्यांनी बेकायदेशीरपणे वाकी, लोणी, मोहरी तेलंगसी, तसेच भूम (जि. उस्मानाबाद) येथील सावरगाव, जेजला, नळीवडगाव, आंतरवली येथे सावकारकीच्या नावाखाली ३१ च्या आसपास शेतकºयांच्या शेतजमीन खरेदी केली आहे व १९ जणांना परत खरेदीखत उलटून दिले आहे. याबाबतचे पुरावे सादर केले. यामुळे जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी ३१ मार्च रोजी आदेश देऊन अर्जदार सोरटे यांनी दिलेले खरेदीखत अवैध घोषित केले. व ते मालकी हक्कासह अभिहस्तांतरण करण्यात येत आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, वाकी तलाठी यांना निकालाच्या प्रती पाठवल्या आहेत. शेतकरी सोरटे यांनी एक हेक्टर शेतजमीन परत मिळविण्यासाठी पाच वर्षांपासून लढा दिला. तत्कालीन जिल्हा उपनिबंधक दिगांबर हौसारे यांनी सव्वा वर्षापूर्वी सहायक निबंधक अनिल गायकवाड यांना सावकार भारतलाल खिंवसरा यांच्यावर बेकायदेशीर सावकारी आढळल्यास गुन्हा दाखल करण्यास पत्राद्वारे सांगितले होते, परंतु, त्याची अद्याप दखल घेतली नाही. विशेष म्हणजे गायकवाड यांनीच २०१५ मध्ये जिल्हा उपनिबंधक यांना अहवालात मत व्यक्त केले आहे. शेतकरी अशोक सोरटे यांनी वर्षभरापासून आयकर विभाग, अहमदनगर व पुणे यांना वेळोवेळी चाळीसच्या आसपास खरेदीखत व परत केलेले व्यवहार निदर्शनास आणून दिले आहे. परंतु, त्यांनी त्याची दखल घेतली गेली नाही. याबाबत चौकशीची मागणी सोरटे यांनी केली आहे.