पालिकेत २३ हजार रुपयांचे झाडू खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:24 IST2021-07-14T04:24:55+5:302021-07-14T04:24:55+5:30
श्रीरामपूर : नगरपालिकेतील ठेकेदारांनी लाखो रुपयांची बिले कामे न करताच काढल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवकांनी केला. एका इलेक्ट्रिकल दुकानातून २३ ...

पालिकेत २३ हजार रुपयांचे झाडू खरेदी
श्रीरामपूर : नगरपालिकेतील ठेकेदारांनी लाखो रुपयांची बिले कामे न करताच काढल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवकांनी केला. एका इलेक्ट्रिकल दुकानातून २३ हजार रुपयांचे झाडू खरेदी करण्यात आले. त्यामुळे मुख्याधिकारी व दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा विरोधकांनी दिला.
पालिकेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा सोमवारी होती. मात्र विरोधकांनी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली सभेवर बहिष्कार टाकला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर गैरकारभाराचे आरोप केले. यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, संजय फंड, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, शहराध्यक्ष संजय छल्लारे, नगरसेवक मुजफ्फर शेख, दिलीप नागरे, मनोज लबडे आदी उपस्थित होते.
ससाणे म्हणाले, शहर स्वच्छतेच्या ठेकेदाराकडे झाडू खरेदीची जबाबदारी असते. मग इलेक्ट्रिक दुकानातील खरेदी हा काय प्रकार आहे. एकाच प्रभागातील कामांची दोन बिले ठेकेदाराला अदा करण्यात आली आहेत. या ठेकेदारांच्या आडून काही मंडळी पैसे लाटत आहेत. स्मशानभूमीतील चौकीदाराला महिना २६ हजार रुपये वेतन दिल्याची खर्चात नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात त्याला केवळ सहा हजार रुपये हातात मिळत आहेत. त्यामुळे उर्वरित रक्कम कोणाच्या खिशात जाते? बोगस बिलांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात फिरून कामांची पाहणी करणार आहोत, असे ससाणे यांनी स्पष्ट केले.
तब्बल २४ नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा बसविण्याकरिता विशेष सर्वसाधारण सभेची लेखी मागणी केली होती. मात्र नगराध्यक्षा अनुराधा अधिक यांनी ऑनलाईन सभा बोलावत त्यातच पुतळ्याचा विषय घेतला. राज्याच्या विधानसभेचे अधिवेशन व नगरच्या महापौर-उपमहापौर निवडीचा कार्यक्रम नुकताच पार पडलेला असताना पालिकेची सभा मात्र जाणीवपूर्वक ऑनलाईन घेतली. गैरकारभार दडपण्यासाठी हा सर्व खटाटोप करण्यात आल्याचा आरोप ससाणे यांनी केला. यावेळी नगरसेविका भारती परदेशी, भाषा रासकर, मीरा रोटे उपस्थित होते.