सवलतीचा लाभ घेत ६७ हजार मालमत्तांची खरेदी-विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:21 IST2021-04-21T04:21:21+5:302021-04-21T04:21:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : मुद्रांक शुल्कामध्ये सप्टेंबर ते डिसेंबर-२०२० या चार महिन्यांत ३ टक्के सवलत आणि जानेवारी ते ...

Purchase and sale of 67,000 properties taking advantage of the discount | सवलतीचा लाभ घेत ६७ हजार मालमत्तांची खरेदी-विक्री

सवलतीचा लाभ घेत ६७ हजार मालमत्तांची खरेदी-विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : मुद्रांक शुल्कामध्ये सप्टेंबर ते डिसेंबर-२०२० या चार महिन्यांत ३ टक्के सवलत आणि जानेवारी ते मार्च -२०२१ या तीन महिन्यांत दोन टक्के सवलत देण्यात आली होती. या सवलतीचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घेतला असून, तब्बल ६७ हजार ७९३ मालमत्तांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले. तसेच कोरोनाच्या काळातही मुद्रांक शुल्क विभागाने जिल्ह्यासाठी दिलेले मुद्रांक शुल्क वसुलीचे तीनशे कोटींचे उद्दिष्टही पार केले आहे.

गतवर्षीच्या मार्चपासून जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे गतवर्षीच्या एप्रिलमध्ये पूर्ण महिनाभर लॉकडाऊन झाला. त्यामुळे एप्रिलमध्ये एकही दस्त नोंदणी झाली नाही. त्यानंतर मे-२०२०मध्ये थोडीफार कार्यालये सुरू झाली होती. जूनपासून अनलॉक सुरू झाल्याने पुन्हा दस्त नोंदणी, मालमत्ता खरेदी- विक्रीचे व्यवहार सुरू झाले. एक सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत राज्य शासनाने मुद्रांक शुल्कामध्ये ५० टक्के सवलत दिली. म्हणजे सहा टक्क्यांऐवजी तीन टक्के शुल्क आकारणी करण्यात आली. ३१ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा शासनाने सवलतीला मुदतवाढ दिली. ही मुदतवाढ देताना ३ टक्क्यांऐवजी ४ टक्के शुल्क आकारणी झाली. म्हणजे केवळ दोन टक्केच सवलत देण्यात आली. एकूण सात महिने नागरिकांनी मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ घेत मालमत्ता खरेदी-विक्री व मालमत्तासंबंधीचे व्यवहार केले. या सात महिन्यांत तब्बल ६७ हजार ७९३ इतके दस्त नोंदले गेले, म्हणजे एवढ्या ग्राहकांनी मालमत्तांची खरेदी-विक्री केली. यातून मुद्रांक विभागाला २१० कोटी ९७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले, तर एप्रिल-२०२० ते मार्च २०२१ या आर्थिक वर्षात ९२ हजार ३७३ इतकी दस्त नोंदणी झाली. त्यामध्ये ३०२ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क वसूल झाले.

-----------------------

वर्षभरातील दस्त नोंदणी व मुद्रांक शुल्क

महिना दस्त नोंदणी शुल्क

एप्रिल-२०२० ०० ००

मे-२०२० २७०७ १०.०१

जून-२०२० ७०२९ २०.९७

जुलै-२०२० ७८६२ २६.६१

ऑगस्ट-२०२० ६९८२ ३४.०३

सप्टेंबर-२०२० ८९१९ २२.०९

ऑक्टोबर-२०२० ८६१५ २५.४४

नोव्हेंबर-२०२० ७८३१ १८.९२

डिसेंबर-२०२० १३३१५ ५०.२६

जानेवारी-२०२१ ८६३१ २७.५६

फेब्रुवारी-२०२१ ९१३१ २१.३४

मार्च-२०२१ ११३५१ ४५.३६

-----------------

गतवर्षीइतकेच उद्दिष्ट साध्य

वर्ष दस्त नोंदणी शुल्क (रुपये)

२०१९-२० ७६२८८ २९८ कोटी

२०२०-२१ ९२३७३ ३०५.७६ कोटी

----------------

राज्य शासनाने मुद्रांक शुल्कामध्ये आधी ३ टक्के आणि नंतर २ टक्के सवलत दिली. त्याला जिल्ह्यातील ग्राहकांनी प्रतिसाद दिला. वर्षभर कोरोनाचे सावट होते. या संकटातही सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालय सुरू ठेवून व सर्व कोरोनाच्या नियमांचे पालन करीत वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात मोठे योगदान दिले आहे. या सर्वांमुळेच गतवर्षीपेक्षाही दस्त नोंदणीची संख्या जास्त झालेली दिसते.

-राजेंद्र पाटील, मुद्रांक जिल्हाधिकारी

---------

फोटो- घराचा टाकणे

Web Title: Purchase and sale of 67,000 properties taking advantage of the discount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.