शेवगावात २६ पथकांच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:46 IST2021-09-02T04:46:56+5:302021-09-02T04:46:56+5:30
अतिवृष्टीमुळे तालुक्यातील वडुले येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे २५० जनावरे दगावल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाच्या वतीने व्यक्त ...

शेवगावात २६ पथकांच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे
अतिवृष्टीमुळे तालुक्यातील वडुले येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे २५० जनावरे दगावल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.
सोमवारी सायंकाळी सुरु झालेला पाऊस रात्रभर तसेच मंगळवारी दुपारपर्यंत सुरुच होता. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. तालुक्यातील बहुतांश पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मंगळवारी दुपारच्या सुमारास पाऊस थांबल्यावर सायंकाळी तालुक्यातील नद्यांचा पूर ओसरला, त्यानंतर वाहतूक व्यवस्था सुरळीत चालू झाली. बुधवारी पूर्णतः पाणी ओसरल्यावर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची दाहकता ठळकपणे समोर आली. पूर ओसरला असला तरीही पूरग्रस्तांना विविध संकटाचा सामना करावा लागतो आहे. नदीच्या प्रवाहात वाहून आलेल्या मृत जनावरांमुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. तसेच घरात पुराचे पाणी घुसून झालेले नुकसान पाहून, अनेकांना सावरणे कठीण झाले आहे. पुरामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. तर काही गावात विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. पुराचा तडाखा बसलेल्या डोंगर आखेगाव, आखेगाव ति., खरडगाव, वरुर बु, वरूर खुर्द, भगूर जोहारापुर, वडुले, शेवगाव शहरातील लांडेवस्ती, कराडवस्ती, ठाकूर पिंपळगाव याठिकाणी शेतातील पिकांचे, मृत पावलेले जनावरे, घराची पडझड, दुकानाचे नुकसान, इतर उपयोगी साधनांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-----------
मंगळवारी सायंकाळी व बुधवारी दिवसभर पुरात वाहून गेलेल्या जनावरांचा व वाहनांचा शोध घेताना काही नागरिक नदी काठच्या गावात फिरताना दिसत होते. तर काही गावात पुराच्या तडाख्यातून सुखरूप वाचून आलेली जनावरे फिरताना दिसून येत असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये होती.
--------------
दर्शनाला गेलेला व्यक्ती पुरात वाहून गेला
तालुक्यातील वडुले येथील मुरलीधर आनंदराव सागाडे हे मंगळवार ( दि.३१) रोज सकाळी गावातील साई बाबांच्या मंदिरात दर्शनासाठी गेले असता, यावेळी अचानक आलेल्या पुरात अडकले होते, पाण्याची पातळी वाढत असल्याने त्यांनी मंदिराच्या कळसाचा आधार घेतला होता मात्र पुराच्या प्रवाहात मंदिरही पाण्यात कोसळले होते. त्यानंतर सागाडे हे बेपत्ता झाले होते. दरम्यान गावातील लोकांनी त्यांचा शोध घेतला, मात्र ते मिळून आले नाही. बुधवारी पुराचे पाणी ओसरल्यानंतर त्यांचा मृतदेह नदीकाठी मिळून आला आहे. सागाडे यांच्या वारसांना चार लाखांची मदत देण्यात येणार असल्याचे तहसीलदार अर्चना पागिरे यांनी सांगितले आहे.
------
नेत्यांचा नुकसानग्रस्त भागांचा दौरा
आमदार मोनिका राजळे, पंचायत समितीचे सभापती क्षितिज घुले, माजी सभापती अरुण लांडे, भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे हे पूरग्रस्त भागांना मंगळवारी व बुधवारी भेटी देत नागरिकांना सावरून धीर देत होते. तर मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले तसेच बुधवारी खासदार सुजय विखे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून संबंधितांना सूचना दिल्या आहेत.
फोटो शेवगाव १,२,३