अक्षय भालेराव याच्या हत्येच्या निषेधार्थ आंबेडकरी बौद्ध जनतेचा नगरमध्ये जनआक्रोश मोर्चा
By साहेबराव नरसाळे | Updated: June 13, 2023 13:44 IST2023-06-13T13:44:36+5:302023-06-13T13:44:47+5:30
जातीय धार्मिक भडकावू भाषणे करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

अक्षय भालेराव याच्या हत्येच्या निषेधार्थ आंबेडकरी बौद्ध जनतेचा नगरमध्ये जनआक्रोश मोर्चा
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील सकल बौद्ध व आंबेडकर समाजाच्या वतीने अक्षय भालेराव याच्या हत्येच्या निषेधार्थ व अक्षय भालेराव या युवकाचा खून खटला जलदगती न्यायालयात चालवावा व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तसेच भालेराव यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करून एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी, कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे. जातीय धार्मिक भडकावू भाषणे करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी.
देशातील महागाई कमी करून देशातील बेरोजगारांना घोषणा केल्याप्रमाणे दोन कोटी नोकऱ्या देण्यात यावे. अल्पवयीन बहुजन झोपडपट्टीत राहणारे मुलांना दंगलीमध्ये दगडफेक करण्यासाठी पुढे करणाऱ्या जातीय आणि धार्मिक शक्तींचा बंदोबस्त करावा तसेच बौद्धांना संरक्षण देण्यासाठी अकार्यक्षम ठरलेल्या शिंदे- फडणवीस सरकारने तत्काळ राजीनामा देण्यात यावा या विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंबेडकरी बौद्ध जनतेच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, सुमेध गायकवाड, सुरेश बनसोडे, किरण दाभाडे, सोमा शिंदे, संजय कांबळे, बंटी भिंगारदिवे, योगेश साठे, नाथा अल्हाट, नगरसेवक राहुल कांबळे, बंडू आव्हाड, विवेक भिंगारदिवे, सागर ठोकळ, प्रा.जयंत गायकवाड, नितीन कसबेकर आदीसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, नांदेड येथील बोंडार गावातील तरुण अक्षय भालेराव याची हत्या करण्यात आली. कारण त्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पहिल्यांदा गावात साजरी केली त्याचा राग मनात धरून गावातील आरोपींनी सगममताने अमानुषपणे हत्या केली व त्याचे कुटुंबीयाला देखील मारहाण केली. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून मारेकऱ्यांना एवढा द्वेष का? कारण जातीय व धार्मिक द्वेष पसरून शांतता भंग करण्याचा जातीयवादी शक्तींकडून प्रयत्न होत आहे. त्यामुळे देशात व राज्यात अविश्वासाचे वातावरण तयार झाले असून महाराष्ट्रात शिंदे- फडणवीस यांचे सरकार अस्थिर असल्यामुळे सरकारचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसून त्यामुळे गुन्हेगार मोकाट सुटले असून. महागाई बेरोजगारी बेकारीमुळे तरुणांच्या हाताला देखील काम राहिले नसून रोजगार मागू नये म्हणून तरुणांच्या डोक्यात जातीयतेचे व धार्मिक तेचे राजकारण वेगाने सुरू झाले आहे.
16 ते 23 वर्ष वयोगटातील गोरगरीब झोपडपट्टीतील बहुजन समाजातील निरागस मुले धर्मांच्या अफुला बळी पडून दंगलीत पुढाकार घेतात. दगडफेक करतात व पोलिसांच्या कारवाईत हे तरुण सापडतात. केंद्र व राज्य सरकारमधील मंत्री व त्यांच्या राजकीय पक्षातील लोक नागपूरच्या आदेशाने विषारी सापासारखे जातीय व धार्मिक द्वेषाचे विष वेगाने पसरवीत असून त्यांच्यावर बंधन घालण्यात पोलीस यंत्रणा व प्रशासन हतबळ झाली आहे.
देशातील सर्वोच्च संस्था या सत्ताधीशांच्या दबावाखाली काम करून स्वातंत्र्य समता बंधुता धर्मनिरपेक्षता आणि पारदर्शकपणा यास हरताळ फासून एकाधिकार शाहीने काम करत आहे.
त्यामुळे सामान्य जनतेच्या मनात केंद्र सरकार विषयी उद्रेक निर्माण झालेला असून आंबेडकरी बौद्ध समाजाचा मोर्चा हा कुणा एका जातीविरुद्ध नसून अन्यायाच्या निषेधार्थ आहे. प्रत्येक धर्म व जातीमध्ये समाजकंटक व गुंड प्रवृत्तीचे लोक असतात. म्हणून तो संपूर्ण समाज दोषी नसतो. दोन समाजामध्ये भांडणे लागावी म्हणून विषारी अपप्रचार करणाऱ्यांचा तीव्र शब्दात निषेध करणयात येत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.