नगर तालुक्यातील २२ गावांत जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:21 IST2021-05-07T04:21:05+5:302021-05-07T04:21:05+5:30
केडगाव : नगर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने १०६ पैकी २२ गावांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पुकारून ...

नगर तालुक्यातील २२ गावांत जनता कर्फ्यू
केडगाव : नगर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने १०६ पैकी २२ गावांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पुकारून गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.
तालुक्यात आजतागायत १३ हजार रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. ग्रामीण भागात कोरानाचे थैमान सुरू असून तालुक्यात २०० जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे गावोगावी जनता कर्फ्यू पुकारण्यात येत आहे.
तालुक्यातील जेऊर, पिंपळगाव माळवी, बहिरवाडी, इमामपूर, खडकी, निंबळक, नवनागापूर, चास, कामरगाव, वाकोडी, दशमीगव्हाण, चिचोंडी पाटील, वडगाव गुप्ता, वाळकी, साकत, निमगाव वाघा, नागरदेवळे, हिंगणगाव, हमीदपूर, टाकळी काझी, दरेवाडी, नांदगाव या गावांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पुकारून गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
तालुक्यातील १०६ गावांपैकी २२ गावांनी जनता कर्फ्यू पुकारून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यात सध्या जवळपास १६०० रुग्ण सक्रिय आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावात कोरोनाने शिरकाव केलेला दिसून येतो. गावोगावी कोरोना ग्रामस्तरीय समितीने पुढाकार घेत जनता कर्फ्यू पुकारण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रशासनाच्यावतीने कोरोनाला आळा घालण्यासाठी अथक प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते तर ग्रामीण भागात नागरिकांचा हलगर्जीपणा चांगलाच भोवला असल्याने कोरोना रुग्ण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहेत.
---
लक्षणे दिसताच तपासणी करा
कोरोना आजाराची लक्षणे दिसताच तत्काळ तपासणी करून घ्यावी व औषधोपचार सुरू करावेत. कोणत्याही परिस्थितीत कोरोना आजार लपवून अथवा अंगावर काढण्याचा प्रयत्न करू नका. वेळीच औषधोपचार केल्याने कोरोना बरा होतो. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याची गरज आहे.
- सविता लांडे,
ग्रामविकास अधिकारी, जेऊर
---
तालुक्यातील बहुतांशी गावांनी जनता कर्फ्यू पुकारून गावातील व्यवहार बंद ठेवले आहेत. याचा निश्चितच फायदा होणार असून कोरोनाची आकडेवारी लवकरच कमी होईल. सर्व दुकाने बंद असल्याने गावात होणारी गर्दी कमी झाली. नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे.
-अंजना येवले,
सरपंच, बहिरवाडी
---
०६ जेऊर बंद
जेऊर येथे व्यावसायिक, नागरिक कडकडीत बंद पाळत आहेत. त्यामुळे गावात शुकशुकाट असतो.