पक्षातील योगदान सिद्ध करा

By Admin | Updated: July 13, 2016 00:36 IST2016-07-13T00:12:57+5:302016-07-13T00:36:56+5:30

अहमदनगर : पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चिंता कुणी करू नये, आपापले तालुके सांभाळा, अशा शब्दात नाराजी व्यक्त करत प्रत्येकाला पक्षातील योगदान सिध्द करावे लागेल,

Prove the contribution of the party | पक्षातील योगदान सिद्ध करा

पक्षातील योगदान सिद्ध करा


अहमदनगर : पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चिंता कुणी करू नये, आपापले तालुके सांभाळा, अशा शब्दात नाराजी व्यक्त करत प्रत्येकाला पक्षातील योगदान सिध्द करावे लागेल, तरच पदे मिळतील, असे माजी विधानसभा अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते दिलीप वळसे यांनी मंगळवारी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावले़ तसेच उठसूठ विरोधकांवर टीका करणाऱ्यांचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला़
राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते़ जिल्ह्यातील पक्षबांधणीवर वळसे यांनी नाराजी व्यक्त केली़ दुष्काळात शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले, या बहुतांश नेत्यांनी मारलेल्या फुशारकीवर वळसे यांनी थेट भाष्य केले़ ते म्हणाले, सामान्य माणसाच्या मदतीला धावून जाण्याची पक्षाची संस्कृती आहे़ सामान्यांच्या प्रश्नासाठी एकत्रित लढा उभारला जाणार असून, प्रत्येकाने जबाबदारीने काम करा, ज्यांना पदे मिळाली (आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, जि़ प़ सदस्य, बाजार समिती सदस्य,माजी आमदार आदी पदे) त्यांनी पदाचा उपयोग पक्षासाठी केला का? पदाच्या माध्यमातून पक्ष कार्यकर्त्यांची कोणती महत्वाची कामे तडीस नेली़ पक्षाच्या कुठल्या कार्यकर्त्याला बळ दिले़ तालुक्यात पक्ष वाढीसाठी काय कार्य केले, याचा हिशोब आता पक्षाला द्यावा लागणार आहे, असे सांगून हा मुद्दा महत्वाचा आहे, याची नोंद करून ठेवा, असे सांगण्यास वळसे विसरले नाहीत़ वळसे यांच्या आक्रमक भाषणामुळे सभागृहात काहीवेळ स्मशान शांतता पसरली़
बैठकीत बोटावर मोजण्या इतक्याच नेत्यांना भाषणाची संधी मिळाली़ त्यात राजेंद्र फाळके यांनी महादेव जाणकरांनी अजित पवार यांची औकात काढली, त्यांच्या निषेध करा, असा ठराव मांडला़ त्यावर नेत्यांची आणि विरोधकांची चिंता तुम्ही करू नका, ते सक्षम आहेत, तुम्ही फक्त पक्षाचे काम नेटाने करा़ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला वेळ आहे़ पण, जिल्ह्यातील आठ महत्वाच्या पालिकांच्या निवडणुका आहेत, त्यांची मोर्चेबांधणी करा, असे सांगून वळसे यांनी व्यासपीठावर कटाक्ष टाकत काका, दादा आपल्याही नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी तालुक्याला जावे लागेल, असे सांगितले़
केवळ भाषण ठोकून काहीही साध्य होणार नाही, असे सुनावत साधे एक कामे दिले ते पूर्ण होत नाही़ प्रत्येक तालुक्यात पक्षाचे किती कार्यकर्ते आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़ प्रश्नाचे उत्तर एकानेही दिले नाही़ वळसे यांनीच पुन्हा किती शंभर आहेत का? असा प्रश्न केला़ त्यावर मात्र सर्वच नेत्यांनी माना डोलवून होकार दिला़
जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, आमदार अरुणकाका जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, पांडुरंग अभंग, जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, आ़ राहुल जगताप, विठ्ठलराव लंघे, संग्राम कोते, राजेंद्र फाळके, अरुण कडू, प्रताप ढाकणे, सुजित झावरे, शिवाजी गाडे आदी यावेळी उपस्थित होते़
(प्रतिनिधी)
यंदा नगराध्यक्ष जनतेतून निवडला जाणार आहे़ त्यामुळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष, अशा दोन्ही आघाड्यांवर पक्षाला काम करावे लागेल़ नगराध्यक्ष पदासाठी कुणी सांगितले म्हणून अमुक एकाला उमेदवारी दिली, असे होणार नाही़ त्याची लोकप्रियता किती आहे, याचा विचार करून सक्षम उमेदवारालाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे वळसे यांनी यावेळी जाहीर केले़ बैठकीनंतर श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, राहुरी, संगमनेर, देवळाली प्रवरा आणि शिर्डी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी पालिकांच्या निवडणूक संदर्भात बंद खोलीत चर्चा केली़

Web Title: Prove the contribution of the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.