संगमनेरात राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:21 IST2021-09-03T04:21:36+5:302021-09-03T04:21:36+5:30
संगमनेर : अकोले रस्त्यावर शहर हद्दीत सावतामाळीनगर आहे. या परिसरात दोन धार्मिक स्थळे असून, जवळच पोलीस वसाहतदेखील आहे. या ...

संगमनेरात राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर निदर्शने
संगमनेर : अकोले रस्त्यावर शहर हद्दीत सावतामाळीनगर आहे. या परिसरात दोन धार्मिक स्थळे असून, जवळच पोलीस वसाहतदेखील आहे. या परिसरात वाइन शॉप सुरू करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे संबंधितांनी अर्ज केला आहे. मात्र, येथे वाइन शॉप सुरू करण्याला नागरिकांचा विरोध कायम असून, गुरुवारी (दि. २) येथील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
शिवसेनेचे संगमनेर शहरप्रमुख, महाराष्ट्र राज्य दारूबंदी कृती समितीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. अनेक महिलांनी हातात फलक घेऊन वाइन शॉपला विरोध केला. अकोले रस्ता येथील सावतामाळीनगर परिसरात वाइन शॉप स्थलांतर करण्याची परवानगी मागण्यात येत आहे. येथे १९८८ सालचे धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी असलेले विठ्ठल मंदिर आहे. येथे भाविक नित्याने दर्शन आणि पूजेसाठी येतात. हरिपाठ आणि कीर्तन होते. प्रत्येक एकादशीला उत्सव साजरा केला जातो. अखंड हरिनाम सप्ताहाचेदेखील आयोजन करण्यात येते. तसेच संबंधित वाइन शॉप स्थलांतरित प्रस्तावाच्या जागेशेजारी कादर बादशहा कादरी मस्जिद (ट्रस्ट क्रमांक बी १४७) इदगाह रस्ता, सावतामाळीनगर, संगमनेर ही मस्जिद आहे. येथे मुस्लीम बांधवांचे नमाजपठण होत असते. येथे नागरी वसाहत असून, येथील रहिवाशांचा वाइन शॉप सुरू करण्यास तीव्र विरोध आहे. परवानगी दिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. तसेच नागरिकांकडून अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करता. वाइन शॉपला परवानगी देऊ नये, असेही शहरप्रमुख कतारी यांनी सांगितले.
----
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांना अहमदनगर येथे जाऊन निवेदन दिले होते. त्यानंतर आज संगमनेरात निदर्शने करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारदारांचे लेखी म्हणणे घेतले आहे. सावतामाळी नगर परिसरात वाइन शाॅप सुरू करण्याला आमचा विरोध कायम आहे. येथे वाइन शॉप सुरू केल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन करणार आहे.
-अमर कतारी, शिवसेना शहरप्रमुख, संगमनेर, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य दारूबंदी कृती समिती
...........
फोटो नेम : ०२संगमनेर आंदोलन
ओळ : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर शिवसेनेचे संगमनेर शहरप्रमुख, महाराष्ट्र राज्य दारूबंदी कृती समितीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.