बैलगाडीत चढून केला पेट्रोल दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:35 IST2020-12-13T04:35:16+5:302020-12-13T04:35:16+5:30
अहमदनगर : पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध करीत नगर शहर शिवसेनेच्यावतीने शनिवारी माळीवाडा बसस्थानक चौकात निदर्शने केली. यावेळी शेतकरी ...

बैलगाडीत चढून केला पेट्रोल दरवाढीचा निषेध
अहमदनगर : पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध करीत नगर शहर शिवसेनेच्यावतीने शनिवारी माळीवाडा बसस्थानक चौकात निदर्शने केली. यावेळी शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला काळे फासून निषेध करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी बैलगाडीच चढून केंद्र सरकारविरोधात घोषणा दिल्या.
शिवसेनेच्यावतीने एस.टी. बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येथे केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल भाववाढीचा निषेध बैलगाडीवर चढून करण्यात आला. तसेच शेतकऱ्यांबद्दल अपशब्द काढणाऱ्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचाही निषेध करण्यात आला. यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे, बाळासाहेब बोराटे, योगिराज गाडे, जि.प.सदस्य संदेश कार्ले, गिरिष जाधव, संतोष गेनप्पा, प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, संग्राम कोतकर, शाम नळकांडे, दत्ता जाधव, रमेश परतानी, राजेंद्र भगत, महिला जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर, दिपक खैरे, अशोक दहिफळे, गौरव ढोणे, मुन्ना भिंगारदिवे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
शहर प्रमुख दिलीप सातपुते म्हणाले, केंद्र सरकार फक्त मोठ-मोठ्या घोषणा करीत आह. प्रत्यक्षात नागरिकांना त्याचा कोणताही लाभ होत नाही. केंद्र सरकार हे मुठभर उद्योगपतींच्या फायद्याचेच निर्णय घेत आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होत असून महागाईमध्ये वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलसह सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत आहेत. यावर तातडीने निर्णय न घेतल्यास आणखी तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल, असे सांगितले.
विक्रम राठोड म्हणाले, शेतकरी आपल्या हक्कांसाठी सनदशिर मार्गाने आंदोलन करत असतांना त्यांना चिनी-पाकिस्तान पुरस्कृत आंदोलन म्हणणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे खरे देशाचे शत्रू आहेत. अन्नदात्त्याबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्य जनतेचाही अनादर केला आहे.
---
फोटो- १२ नगर शिवसेना
पेट्रोल दरवाढ आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी बैलगाडीवर चढून निषेध केला. यावेळी रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले.