घरांवर काळे झेंडे फडकवून मोदी सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:22 IST2021-05-27T04:22:25+5:302021-05-27T04:22:25+5:30
संगमनेर तालुका किसान संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात शिवाजी गायकवाड, सहसंयोजक अनिल गुंजाळ, शांताराम गोसावी, सुनंदा राहणे, ज्ञानदेव ...

घरांवर काळे झेंडे फडकवून मोदी सरकारचा निषेध
संगमनेर तालुका किसान संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात शिवाजी गायकवाड, सहसंयोजक अनिल गुंजाळ, शांताराम गोसावी, सुनंदा राहणे, ज्ञानदेव सहाणे, ज्ञानेश्वर राक्षे, आदी सहभागी झाले होते. नागरिकांनी आपल्या घरावर, कार्यालयावर काळा झेंडा फडकावून मोदी सरकारचा निषेध करावा, असे आवाहन करण्यात आले होते.
ॲड. शिवूरकर म्हणाल्या, बहुमताच्या जोरावर कलम ३७० रद्द केले. घाईने नागरिकत्व नोंदणी कायदा निर्माण करून जनतेत दहशत आणि भय निर्माण केले. सार्वजनिक क्षेत्रातील बीएसएनएल, रेल्वे, कोळसा व अन्य खनिज उद्योग भांडवलदार आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना विकण्याचे मोठे षङयंत्र या सरकारने यशस्वी केले. सरकारच्या भांडवलदारधार्जिण्या धोरणांमुळे देशात बेरोजगारी वाढली आहे. देशातील शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांच्या चळवळीने संघर्ष करून मिळविलेले हक्क आणि कायदे बहुमताच्या जोरावर संघटनांशी आणि संसदेत चर्चा न करता नष्ट करण्यात आले आहेत.
शेतकरी संघटनांनी मागणी केलेली नसताना, या संघटनांचा विरोध असताना गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटात घाईने तीन काळे कृषी कायदे मंजूर केले. या कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या किसान संघर्ष समितीच्या आंदोलनास २६ मे ला सहा महिने पूर्ण झाले. सरकारने हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, तरीही शेतकरी हटले नाहीत. कोरोनाकाळात जनता उपचार, औषधे आणि ऑक्सिजनअभावी मृत्यूचा सामना करीत असताना मोदी, शहा निवडणूक प्रचारात दंग होते. सेंट्रल विस्टा प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. देश संकटात असताना पक्षीय आणि द्वेषाचे राजकारण करण्यात सरकार दंग आहे. सरकारच्या या धोरणाच्या निषेधार्थ भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने देशभर ‘मोदी सरकार निषेध दिवस’ पाळण्यात आला, असेही ॲड. शिवूरकर यांनी सांगितले.