१९ कारखान्यांचे गाळपासाठी प्रस्ताव
By Admin | Updated: September 30, 2014 23:21 IST2014-09-30T23:18:21+5:302014-09-30T23:21:31+5:30
अहमदनगर : दुष्काळाच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाऱ्यासाठी उसाचा वापर झाला. यामुळे जिल्ह्यात उपलब्ध असणाऱ्या उसापैकी साधारण २० ते २५ टक्के ऊस संपला आहे.

१९ कारखान्यांचे गाळपासाठी प्रस्ताव
अहमदनगर : दुष्काळाच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाऱ्यासाठी उसाचा वापर झाला. यामुळे जिल्ह्यात उपलब्ध असणाऱ्या उसापैकी साधारण २० ते २५ टक्के ऊस संपला आहे. याचा परिणाम गाळपावर होण्याची शक्यता असली तरी शंभर लाख मेट्रीक टन उसाचे गाळप होण्याची शक्यता सहसंचालक साखर यांच्या कार्यालयाकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, १९ कारखान्यांकडून गाळप परवान्यासाठी सहसंचालक यांच्याकडे प्रस्ताव सादर झाले आहेत.
जिल्ह्यात पारनेर आणि नगर वगळता १४ सहकारी व ६ खासगी असे २० साखर कारखाने आहेत. या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात यंदा पावसाअभावी उसाची टंचाई जाणवणार आहे. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या कार्यालयाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात १ लाख २२ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र गृहीत धरण्यात आलेले आहे. या क्षेत्रातून शंभर लाख मेट्रीक टन गाळप होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी विभागात २० कारखान्यांनी केलेल्या गाळपात ९२ लाख ९२ हजार मेट्रीक टन उसाचे गाळप केले होते. साधारण जानेवारी ते मार्च २०१३ या दरम्यान झालेली गारपीट आणि त्यानंतर निर्माण झालेल्या पाणी टंचाईचा फटका शेतात उभ्या असणाऱ्या उसाला बसला. यामुळे उपलब्ध उसापैकी सुमारे २० ते २५ टक्के ऊस संपला आहे. जिल्ह्यात यंदाच्या हंगामासाठी ३७ हजार ९१७ हेक्टरवर आडसाली, ३३ हजार ४०५ पूर्वहंगामी, ४६ हजार ४६३ सुरू आणि ६० हजार २१४ खोडवा आहे. यंदा परिस्थिती विपरीत होती. जुलै महिन्यापर्यंत चाऱ्यासाठी उसाचा वापर करण्यात आला. यामुळे सर्व कारख्यान्यांच्या कार्यक्षेत्रात कमी अधिक उभ्या उसाचे क्षेत्र घटले आहे. याचा परिणाम गाळपावर होणार आहे. अशा परिस्थितीत शंभर मेट्रीक टन गाळप होईल असा अंदाज प्रादेशिक सहसंचालक विभागाला आहे. १९ कारखान्यांकडून गाळप परवान्यासाठी सहाय्यक संचालक यांच्याकडे प्रस्ताव सादर केलेले आहेत. यातून १२ प्रस्ताव साखर आयुक्त पुणे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. उर्वरित कारखान्यांच्या प्रस्तावात त्रुटी असल्याने त्यांची पूर्तता करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात साधारण १५ आॅक्टोबरपर्यंत सर्व कारखान्यांचे बॉयलर पेटणार आहेत.
(प्रतिनिधी)