शेवगाव, पाथर्डी तालुक्याच्या पाणी योजनेला चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:39 IST2021-03-04T04:39:35+5:302021-03-04T04:39:35+5:30
शेवगाव : शेवगाव, पाथर्डी तालुक्याच्या पाणी योजनेच्या तांत्रिक बाबी समजून घेण्यासाठी मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.३) बैठक घेतली. यावेळी ...

शेवगाव, पाथर्डी तालुक्याच्या पाणी योजनेला चालना
शेवगाव : शेवगाव, पाथर्डी तालुक्याच्या पाणी योजनेच्या तांत्रिक बाबी समजून घेण्यासाठी मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.३) बैठक घेतली. यावेळी योजना संदर्भात विविध मुद्यांवर चर्चा झाल्याचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी सांगितले.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शेवगाव व पाथर्डी नगर परिषदेसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेला मागील सरकारच्या काळात तत्वतः मान्यता मिळाली होती. दरम्यान सत्तांतरानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात तांत्रिक मान्यतेअभावी सदर योजनेचा प्रस्ताव रखडला होता. यासंदर्भात मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी, विविध संघटना, पदाधिकारी, नेते यांनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. मान्यता कधी मिळणार याकडे शेवगाव, पाथर्डीकरांच्या नजरा लागल्या असताना बुधवारी मंत्रालयात कक्ष अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या योजनेच्या संदर्भात तांत्रिक बाबी, मुद्दे यावर बैठक झाल्याचे कळताच नागरिकांतून आनंद व्यक्त होत आहे.
नगरविकास मंत्र्यांच्या दालनात मंजुरी अभावी ही योजना अडकलेली आहे. त्याच ठिकाणी योजने विषयी हालचाली सुरू झाल्याने आशादायी चित्र निर्माण झाले. केव्हा मंजुरी मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्याची शेवगाव-पाथर्डी व ५४ गावे अशी पाणी पुरवठा योजना १ एप्रिल १९९९ साली, १ लाख ३५ हजार लोकसंख्या गृहीत धरुन कार्यान्वित करण्यात आली. मात्र या योजनेचे आयुर्मान २००५ साली संपले आहे. जलशुद्धीकरण प्रकल्प, जलवाहिनीचे आयुष्यमान संपलेले आहे.
योजनेचे आयुर्मान संपल्याने नगरविकास विभाग अंतर्गत, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतून शेवगाव नगरपरिषद करिता ६९ कोटी तर पाथर्डी नगर परिषदेसाठी ६३ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला. आगामी ३० वर्षांचा विचार करून २०५० पर्यंत दरडोई १३५ लिटर पाणी पुरवठा या योजनेत प्रस्तावित करण्यात आलेला आहे. या योजनेसाठीचा नगर परिषदेचा हिस्सा निधीही शासनाकडे भरण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या दोन्ही योजनेला नगरविकास विभागाची तत्त्वतः मान्यता मिळाली असून तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया होऊन काम सुरु होऊ शकते. परंतु, तांत्रिक मान्यता केव्हा मिळते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.