पायाला भिंगरी लावून शिक्षक नेत्यांचा प्रचार जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2016 23:44 IST2016-02-21T23:43:29+5:302016-02-21T23:44:05+5:30
अहमदनगर : शिक्षक बँकेच्या मतदानासाठी आता अवघे ५ दिवस बाकी आहेत. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सर्व मंडळांचे नेते पायाला भिंगरी लावून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांत फिरत होते.

पायाला भिंगरी लावून शिक्षक नेत्यांचा प्रचार जोमात
अहमदनगर : शिक्षक बँकेच्या मतदानासाठी आता अवघे ५ दिवस बाकी आहेत. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सर्व मंडळांचे नेते पायाला भिंगरी लावून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांत फिरत होते. अकोलेसारख्या दुर्गम भागापासून कर्जत, जामखेड, नेवासा, शेवगाव, पाथर्डी आणि कोपरगाव तालुक्यात वेगवेगळ्या मंडळांचे नेते प्रचारात व्यस्त होते. एका मंडळाचे नेते येवून गेल्यानंतर दुसऱ्या मंडळाचे नेते त्या ठिकाणी भेटी देत होते. यामुळे सभासदांची चांगलीच करमणूक होत होती.
जिल्हा शिक्षक बँकेच्या २१ संचालक मंडळाच्या जागेसाठी पुढील रविवारी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रमुख मंडळात निर्माण झालेली नाराजी दूर करताना नेत्यांच्या नाकीनऊ आले आहेत.
कोणत्याही परिस्थितीत यंदा परिवर्तन घडवायचे, असा चंग विरोधकांनी बांधला आहे, तर मत विभागणीचा फायदा होवून सत्ता क शाप्रकारे आपल्याच ताब्यात राहील, यासाठी सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न होताना दिसत आहेत. विशेषकरून प्रचारादरम्यान विरोधी मंडळातील नाराज नेते आणि कार्यकर्त्यांना हेरून सत्ताधारी मंडळ गळाला लावताना दिसत आहे.
पुढील ५ ते ६ दिवसात शिक्षक बँकेत गेल्या १० ते १५ वर्षांत सत्तेत असणाऱ्या मंडळाच्या कारभाराचा पंचनामा होणार आहे.
यासाठी सर्व मंडळांनी तयारी केली आहे. यंदाची निवडणूक माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लढवण्यात येणार आहे. रविवारी दिवसभर शिक्षक नेते जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात प्रचारात व्यस्त असल्याचे दिसून आले.
(प्रतिनिधी)