श्रीरामपूरमध्ये पुनाळेकर यांच्या अटकेचा निषेध : हिंदू रक्षा समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 12:42 IST2019-05-29T12:42:01+5:302019-05-29T12:42:07+5:30
हिंदू विधीज्ञ परिषदेचे सचिव संजीव पुनाळेकर व कार्यकर्ते विक्रम भावे यांना सीबीआयने डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी केलेल्या अटकेचा येथील हिंदू रक्षा कृती समितीने आंदोलनाच्या माध्यमातून निषेध केला.

श्रीरामपूरमध्ये पुनाळेकर यांच्या अटकेचा निषेध : हिंदू रक्षा समिती
श्रीरामपूर : हिंदू विधीज्ञ परिषदेचे सचिव संजीव पुनाळेकर व कार्यकर्ते विक्रम भावे यांना सीबीआयने डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी केलेल्या अटकेचा येथील हिंदू रक्षा कृती समितीने आंदोलनाच्या माध्यमातून निषेध केला.
श्रीरामपूर शहरातील राम मंदिर चौकात बुधवारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत निषेधाच्या घोषणा दिल्या. यानंतर तहसील कार्यालयातील वरिष्ठ लिपीक निलेश सोनसाळे यांना निवेदन देण्यात आले. हिंदू रक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय जयस्वाल, दीपक डावखर, रुद्रशम्भू प्रतिष्ठानचे कृष्ण करपे, जय श्रीराम ग्रुपचे भरत शेळके, शुभम कांबे, रामेश्वर भुकन आदी उपस्थित होते.
अटक झालेल्या संजीव पुनाळेकर यांचे व श्रीरामपूरचे जवळचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. येथील हिंदू बांधवांना अडचणीच्या वेळी त्यांनी नि:स्वार्थपणे सहाय्य केले आहे. केवळ महाराष्ट्राच नव्हे तर भारतभर हिंदुत्ववाद्यांना मदत करणाऱ्या पुनाळेकरांना अटक करणाºया सरकारचा आम्ही निषेध करतो, असे जयस्वाल याप्रसंगी म्हणाले.
दाभोळकरांच्या हत्येला अनेक वर्षे झाली. अजूनही या बाबतचा सबळ पुरावा पोलिसांना सापडलेला नाही. असे असताना नाहक हिंदूत्ववाद्यांचा बळी दिला जातो आहे. हे केवळ पुरोगाम्यांच्या दबावाखाली होत आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली.