पर्यावरण समितीअभावी वाळू लिलाव लांबणीवर
By Admin | Updated: October 17, 2016 01:06 IST2016-10-17T00:39:45+5:302016-10-17T01:06:20+5:30
अहमदनगर : पर्यावरण तज्ज्ञ समितीअभावी वाळू लिलावाची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे़ ग्रामपंचायतींची मंजुरी मिळूनही प्रस्ताव लालफितीत अडकले असून,

पर्यावरण समितीअभावी वाळू लिलाव लांबणीवर
अहमदनगर : पर्यावरण तज्ज्ञ समितीअभावी वाळू लिलावाची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे़ ग्रामपंचायतींची मंजुरी मिळूनही प्रस्ताव लालफितीत अडकले असून, वाळूमाफियांना रान मोकळे आहे़ बेकायदा उपशावरून अधिकाऱ्यांवरील हल्ल्यांची मालिका सुरूच आहे़ या हल्ल्यांतून प्रशासन धडा घेणार की नदीपासून ते लिलावापर्यंत केवळ कागदी घोडे नाचवित राहणार हा खरा प्रश्न आहे़
गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला़ त्यामुळे नद्या वाहत्या झाल्या़ पाण्याबरोबर वाळूही वाहून आली़ या वाळूवर वाळूतस्करांचा डोळा आहे़ अधिकृत लिलाव न घेताच वाळूचा चोरट्या मार्गाने उपसा कधीचाच सुरू झाला आहे़ उत्तर नगर जिल्ह्यातील मुळा, गोदावरी आणि प्रवरा नदी पात्रात उत्तम प्रतीची वाळू आहे़ या वाळूला सोन्याचा भाव आहे़ पावसामुळे बांधकाम क्षेत्रातील मंदीही काहीशी दूर झाली आहे़ बांधकाम व्यावसायिकांकडून वाळूची मागणी वाढली आहे़ मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील वाळूमाफिया सक्रिय झाले आहेत़ या वाळूमाफियांना रोखण्यासाठी प्रशासनाकडे सक्षम यंत्रणा नाही़ जिल्हास्तरीय पथक नियुक्त केले आहे़ मात्र हे पथकही नावालाच आहे़ पथक कारवाईसाठी गेले़ पण त्यांच्या हाती काहीच लागत नसल्याचे मागीलवर्षीच्या अहवालावरून समोर आले़ पथकाला कोणीच सापडत नाही़ अधिकारी कारवाईला गेल्यास त्यांच्यावर प्राणघातक हल्ले होतात़ उपविभागीय अधिकारी गोविंद दाणेज यांच्यावरील हल्ला हे त्याचे मूर्तीमंत उदाहरण आहे़ अधिकाऱ्यांवरील वाढते हल्ले पाहता वाळूतस्करांवर प्रशासनाचा वचक नसल्याचे उघड झाले असून, हे पथक नेमके करतात काय हा प्रश्न अनुत्तरित आहे़
वाळू साठ्यांचे संरक्षण करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे, हे उघड आहे़ वाळूची विक्री करण्यातही प्रशासकीय पातळीवर कमालची उदासीनता आहे़ सरकारने वाळू लिलावाची प्रक्रिया सुलभ केली़ त्यामुळे मुदतीत लिलाव होणे अपेक्षित होते़ मात्र स्थानिक प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे लिलाव प्रक्रियाच लांबणीवर पडली आहे़ जिल्हा गौण खनिज विभागाने ४९ पात्र वाळू साठ्यांच्या लिलावाचा प्रस्ताव तयार केला़ मात्र ऐनवेळी पर्यावरण समितीच बरखास्त करण्याची नामुष्की ओढावली़ या समितीच्या मंजुरीनंतर लिलाव काढावेत, असे संकेत आहेत़ ही समिती स्थापनेसाठी अर्ज मागविले असून, समिती स्थापन झाल्यानंतरच वाळू लिलाव प्रक्रियेला मुहूर्त मिळणार आहे़ तोपर्यंत नदीतीत वाळू राहील का, हा खरा प्रश्न आहे़ (प्रतिनिधी)