प्राध्यापक निघाले विद्यार्थ्यांच्या शोधात
By Admin | Updated: June 29, 2014 00:29 IST2014-06-28T23:51:55+5:302014-06-29T00:29:52+5:30
अहमदनगर : काही खास महाविद्यालयात अकरावी प्रवेशासाठी संस्थाध्यक्ष, आमदार-खासदारांच्या वशिल्याच्या चिठ्ठ्या मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची धडपड सुरू आहे.
प्राध्यापक निघाले विद्यार्थ्यांच्या शोधात
अहमदनगर : काही खास महाविद्यालयात अकरावी प्रवेशासाठी संस्थाध्यक्ष, आमदार-खासदारांच्या वशिल्याच्या चिठ्ठ्या मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची धडपड सुरू आहे. तर दुसरीकडे काही महाविद्यालयातील प्राध्यापकांवर विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. नगरमधील काही प्राध्यापक व प्राचार्यही विद्यार्थी मिळवण्यासाठी खेड्यात चकरा मारीत आहेत. त्यांची वाट्टेल ती ‘डिमांड’ पुरवण्यासाठीही त्यांची तयारी आहे. गावोगावी जाऊन संबंधित प्राध्यापक महाशय ही ‘स्किम’ पालक आणि विद्यार्थ्यांच्या गळी उतरवित आहेत.
सध्या अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा परिषदेने आखून दिलेल्या तारखेनुसार प्रवेश अर्ज भरले गेले आहेत. नगर शहरातील काही महाविद्यालयांत प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची अक्षरश: झुंबड उडाली आहे. त्यांच्याकडील अर्जविक्रीवरून हे निदर्शनास आले आहे. बहुतांशी विद्यार्थी हे मोठ्या महाविद्यालयात प्रवेशासाठी इच्छुक आहेत. विशेषत: कनिष्ठ महाविद्यालयांना सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांमध्ये ‘सरप्लस’(अतिरिक्त) ठरण्याची भीती आहे. पटसंख्येच्या नवीन नियमाने त्यांची गोची केली आहे. कनिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापकांनाही विद्यार्थी न मिळाल्याने तुकडी उडण्याची तसेच संस्थेत आपण सरप्लस होण्याची भीती आहे. या भीतीने ते विद्यार्थ्यांच्या शोधात निघाले आहेत.
काय आहेत कारणे...
खेड्यातील विद्यार्थी शहरातील महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी प्राधान्य देत आहेत. शहरातील विद्यार्थ्यांचाही ठराविक महाविद्यालयांकडेच ओढा आहे. माध्यमिक शाळेला जोडून असलेल्या काही कनिष्ठ महाविद्यालयात एकतर शिक्षणाची गुणवत्ता नाही. दुसरे म्हणजे ग्रामीण भागात खासगी शिकवणीची सोय नाही. वैद्यकीय किंवा अभियांत्रिकीकडे जाणारे विद्यार्थी कॉलेज सुरू असतानाच सीईटीचा अभ्यास करतात. विद्यार्थिंनींसाठी तालुक्याच्या ठिकाणी चांगले होस्टेल नसणे. या कारणांमुळे त्यांची पसंती शहरातील महाविद्यालयांना आहे.
-खासगी क्लासचालक.
अशी आहे स्किम...
तुम्ही आमच्या महाविद्यालयात प्रवेश घ्या. तुमचा शहरात जाण्याचा ताण वाचेल. प्रवेश शुल्कात सवलत दिली जाईल. परीक्षा शुल्कही मोजकेच आकारले जाईल. इतर कोणताही छुपा खर्च लावला जाणार नाही. प्रवेश घेऊन कॉलेजमध्ये अधून-मधून आले तरी चालेल. परीक्षेवेळी आम्ही सर्वोतोपरी मदत करू. शिवाय पास करून देण्याची गॅरंटी. शहरातील काही कनिष्ठ महाविद्यालयांनीही हा ‘फंडा’ अवलंबिला आहे.
जागेचा लेखाजोखा
जिल्ह्यात ७१४ तुकड्या आहेत. त्यातून ६३ हजार ६०० विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. त्यात स्वयंअर्थसाहाय्यित शाळांच्या १ हजार ५०० जागा वाढीव आहेत. या वर्षी पुन्हा त्यात ७ हजार जागांची भर पडली आहे. अशा एकूण ७२ हजार १०० जागा आहेत. दहावीचे ६९ हजार ८८ विद्यार्थी होते. त्यातील ६४ हजार १८३ उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षांर्थीं(रिपिटर्स)पैकी १ हजार १९१ उत्तीर्ण झाले. या उत्तीर्णां पैकी पॉलीटेक्निक, आयटीआयला जाणाऱ्यांचेही मोठे प्रमाण आहे. त्यामुळे आणखीच जागा शिल्लक राहतील. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने हे बाजारू गणित निर्माण झाले आहे. त्यातून वरील अजब ‘स्किम’ने जन्म घेतलाय.
विद्यार्थ्यांची ‘खोगिरभरती’
‘खास’ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रवेशासाठी रांगा लावतात. तेथे खास दर आकारणी होते. पालकही पाल्यांसाठी ‘देणगी’ देतात. या महाविद्यालयांमध्ये तुकडीत ठरवून दिलेल्या संख्येपेक्षाही जास्त विद्यार्थी भरले जातात. या भरती प्रक्रियेमुळे संबंधित महाविद्यालयात केवळ खोगिरभरती वाढते.
प्रवेशाचे वेळापत्रक
१९ ते २६ जून प्रवेश अर्ज विक्री
२७ व २८ जून कॉलेजकडून प्राप्त अर्जाची नोंदणी
३० जून प्राथमिक गुणवत्ता यादीची प्रसिद्धी
२ जुलै अंतिम गुणवत्ता यादी
३ ते ५ जुलै गुणवत्तायादीप्रमाणे प्रवेश
७ ते १४ जुलै प्रतीक्षा यादी १ ते ३ प्रसिद्ध करणे.
१५ जुलै प्रतीक्षायादीनुसार प्रवेश
१६ ते १९ जुलै गुणवत्तेनुसार प्रवेश