मढी येथे जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:15 IST2020-12-27T04:15:56+5:302020-12-27T04:15:56+5:30

तीसगाव : जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी सायंकाळी श्री क्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे भेट दिली. मोक्षदा एकादशीनिमित्त चैतन्य ...

Problems learned by the District Collector at Madhi | मढी येथे जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या समस्या

मढी येथे जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या समस्या

तीसगाव : जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी सायंकाळी श्री क्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे भेट दिली. मोक्षदा एकादशीनिमित्त चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधीस सपत्नीक महाभिषेक करीत त्यांनी पूजा केली. यावेळी विश्वस्त ग्रामस्थांशी संवाद करीत विकासकामांची माहिती घेत समस्या जाणून घेतल्या.

मढी येथून धामणगाव देवीचे व तीसगाव निवडुंगेसह घाटशिरस गावी जाणाऱ्या जोडरस्त्यांच्या रुंदीकरणासह मजबुतीकरण केले जावे. जिल्ह्यात व बाहेरही विविध ठिकाणी देवस्थानच्या नावे असलेली एक हजार शंभर एकर जमीन देवस्थानच्या ताब्यात मिळावी यासाठी प्रशासन स्तरावरून सहकार्य मिळावे, अशी मागणी कोषाध्यक्ष राधाकिसन मरकड, विश्वस्त अर्जुनराव शिरसाठ यांनी केली.

कोरोना कालखंडात मास्क, सॅनिटायझर वाटपासह गरजू, वंचितांना किराणा साहित्य, अन्नप्रसादाच्या देवस्थानने केलेल्या वितरणाची माहिती प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी जिल्हाधिकारी यांना दिली. येथील जोडरस्ते व विकासकामांबाबत सकारात्मक भूमिका घेऊ, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

विश्वस्त भाऊसाहेब मरकड यांनी स्वागत केले. रवींद्र आरोळे यांनी आभार मानले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नी दीपाली भोसले, तहसीलदार श्याम वाडकर, कार्यकारी अधिकारी अशोक पवार, व्यवस्थापक बाबासाहेब मरकड, भानुविलास मरकड, अविनाश मरकड आदी उपस्थित होते.

फोटो : २६ मढी

मढी येथे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या पत्नी दीपाली भोसले यांचा देवस्थानच्या वतीने कानिफनाथांची प्रतिमा व शाल देऊन सन्मान करताना विश्वस्त.

Web Title: Problems learned by the District Collector at Madhi