खासगी वैद्यकीय सेवा देणाऱ्यावर नियंत्रण ठेवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:21 IST2021-04-04T04:21:14+5:302021-04-04T04:21:14+5:30
कोपरगाव : शहरासह तालुक्यात खासगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या हॉस्पिटल, मेडिकल व लॅब यांच्यावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी शिवसेना ग्राहक ...

खासगी वैद्यकीय सेवा देणाऱ्यावर नियंत्रण ठेवावे
कोपरगाव : शहरासह तालुक्यात खासगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या हॉस्पिटल, मेडिकल व लॅब यांच्यावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे कोपरगाव उपशहर प्रमुख राहुल देशपांडे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष विधाते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
देशपांडे म्हणाले, कोपरगावात सध्या दररोज १०० पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. यातील काही रुग्णांवर सरकारी कोविड केअर सेंटर येथे तर काही खासगीत उपचार घेतात. मात्र, उपचार घेत असताना खासगी दवाखाने, मेडिकल व लॅब येथे ठराविक औषधांमध्ये कृत्रिम टंचाई निर्माण होत आहे. त्यातून रुग्णांची लुटमार सुरू आहे. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे खासगी रुग्णालयात एका दिवसासाठी ४,५०० प्रमाणे प्रति दिवस बिल आकारले पाहिजे, मात्र तसे होत नाही. तसेच कोरोनाची तपासणी खासगीत केली तर १,००० ते १,५०० रुपयाचा फरक पडतो आहे. मेडिकलमध्ये औषध घेण्यासाठी गेल्यास शिल्लक नाही, असे सांगितले जाते. तर तेच औषध अर्ध्या तासाने उपलब्ध होऊन त्यासाठी दुप्पट किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे या प्रकारावर लवकरात लवकर नियंत्रण आणावे.