खासगी सावकारीचा निघोजला एकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST2021-06-21T04:15:32+5:302021-06-21T04:15:32+5:30

निघोज : पारनेर तालुक्यातील निघोज येथे एकावर खासगी सावकारीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत नवनाथ लंके यांच्या फिर्यादीवरून बाबाजी ...

Private lender commits one offense | खासगी सावकारीचा निघोजला एकावर गुन्हा

खासगी सावकारीचा निघोजला एकावर गुन्हा

निघोज : पारनेर तालुक्यातील निघोज येथे एकावर खासगी सावकारीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत नवनाथ लंके यांच्या फिर्यादीवरून बाबाजी गयाजी लंके (रा. निघोज, ता. पारनेर) यांच्याविरोधात बेकायदा खासगी सावकारी केल्याचा गुन्हा पारनेर पोलीस ठाण्यात दाखल झाला.

निघोज येथील नवनाथ लंके यांना बाबाजी लंके यांनी जानेवारी २०१७ मध्ये ५० हजार रुपये व्याजाने दिले होते. ही रक्कम त्यांना पाच रुपये शेकडा प्रमाणे दिली होती. त्यापैकी ३० हजार रुपये धनादेशाने तर २० हजार रुपयांचे दिले होते. त्यानंतर पुढील वीस महिने दरमहा अडीच हजार रुपयांप्रमाणे नवनाथ लंके यांनी सावकार बाबाजी लंके यांना व्याजापोटी अदा केले. तो सर्व व्यवहार त्यांनी पूर्ण केला होता. त्यानंतर नवनाथ लंके यांनी २०१९ मध्ये पुन्हा त्यांच्याकडून ५० हजार रुपये व्याजाने घेतले. त्यानंतर पुढील १८ महिने त्यांना दरमहा अडीच हजार व्याज अदा केले. व्याज वाढतच असल्याने नवनाथ लंके यांनी पूर्ण रक्कम एकरकमी देतो काहीतरी रक्कम कमी करा, अशी मागणी सावकाराकडे केली. परंतु, त्यास सावकाराने नकार दिला. त्यानंतर नवनाथ लंके यांच्याकडे पैशांसाठी सतत तगादा लावला. व्याजाने रक्कम घेणारे नवनाथ लंके यांनी एका मध्यस्थामार्फतही सावकाराकडे व्याजाचे पैसे कमी करण्याचे साकडे घातले. परंतु, त्यासही सावकाराने नकार दिला, असे तक्रारीत म्हटले आहे.

त्यानंतर नवनाथ लंके यांनी पारनेर पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची पडताळणी करून महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या कलम ३९ व ४५ नुसार, विनापरवाना व बेकायदा खासगी सावकारी करून शोषण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे करत आहेत.

Web Title: Private lender commits one offense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.