ऑक्सिजन मिळत नसल्याने खासगी डॉक्टर हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:19 IST2021-04-17T04:19:55+5:302021-04-17T04:19:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : शहरात गेल्या दोन दिवसापासून ऑक्सिजन सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे खासगी कोविड ...

Private doctor helpless due to lack of oxygen | ऑक्सिजन मिळत नसल्याने खासगी डॉक्टर हतबल

ऑक्सिजन मिळत नसल्याने खासगी डॉक्टर हतबल

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : शहरात गेल्या दोन दिवसापासून ऑक्सिजन सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे खासगी कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करताना डॉक्टरांच्या नाकीनऊ आले असून हतबलता आली आहे. त्यामुळे रूग्णांसह नातेवाईकांचे हाल होत आहे. मात्र, या परिस्थितीस नेमके जबाबदार कोण ? असा प्रश्न या निमिताने नातेवाईकांमधून उपस्थित केला जात आहे.

कोपरगाव शहरात गेल्या महिन्यापासून मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे प्रकृती गंभीर अथवा ऑक्सिजन पातळी खालावल्यानंतर दवाखाना गाठत आहेत. त्यामुळे सर्वच दवाखाने खचाखच भरले असून अशा रुग्णांना खूप जास्त प्रमाणात कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यामुळे गेल्या दोन ते तीन दिवसात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडरची मागणी वाढली आहे. परंतु, पुरवठा मागणीच्या पटीत अत्यल्प होत आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांना बाधित रुग्णांवर उपचार करावे की, ऑक्सिजन सिलिंडर पाहात फिरावे, अशी अवस्था झाली आहे. दोन दिवसापूर्वी तर शहरातील कोठारी हॉस्पिटलमधील रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही, म्हणून औद्योगिक वसाहतीमधील, गॅस वेल्डिंग करणाऱ्याकडून सिलिंडर उपलब्ध करून आहे. त्या रुग्णांना ऑक्सिजन दिला व त्यांचे प्राण वाचले.

............

ठोस उपाययोजना का नाही ?

ऑक्सिजनची गरज भासणार आहे. हे प्रशासकीय अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना ठाऊक असताना देखील हा तुटवडा निर्माण होण्यापूर्वीच उपाययोजना का केल्या नाहीत. प्रशासन हतबल झाले असेल तर लोकप्रतिनिधींनी स्वतःचे राजकीय वजन वापरून हा तुटवडा भरून काढत रुग्णांना दिलासा देण्याचे काम का केले नाही.

......

कोपरगावचे रुग्ण दुहेरी संकटात...

खासगी कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना मागील आठवड्यात रेमडेसिविर इंजेक्शनच्या तुटवड्याला सामोरे जावे लागले. प्रसंगी पाच ते दहा हजार रुपये देऊन इंजेक्शनची खरेदी करावी लागली. अजूनही परिस्थिती सुधारलेली नाही, तेच आता पुन्हा ऑक्सिजन सिलिंडरच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मागूनही सिलिंडर मिळत नाही. त्यामुळे सद्यस्थितीत कोपरगावचे रुग्ण दुहेरी संकटात सापडले आहे.

...........

माझ्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना दररोज ५० ते ६० ऑक्सिजन सिलिंडर लागत आहे. मागूनही सिलिंडर मिळत नाही. खूप धावपळ होत आहे. बुधवारी तर अक्षरश : कुठेच सिलिंडर मिळाले नाही. शेवटी औद्योगिक वसाहत, गँँस वेल्डिंगवाल्याकडून सिलिंडर आणून रुग्णांना ऑक्सिजन पुरविला. अजूनही परिस्थिती सुधारलेली नाही. त्यामुळे गेल्या दोन दिवसात ऑक्सिजनची गरज असणाऱ्या नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांना भरती करून घेत नाही. ऑक्सिजन मिळेलच याची खात्री नसल्यामुळे हतबल झालो आहे. त्यामुळे प्रशासनाने ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून द्यावे.

- डॉ. योगेश कोठारी, संचालक कोठारी हॉस्पिटल, कोपरगाव

...........

अशी आहे खासगी हॉस्पिटलची व्यवस्था ..*

* व्हेटिलेटर बेड - ०९

* आयसीयु बेड - ७१

* ऑक्सिजन बेड - १२४

* सर्वसाधारण बेड - ३४३

......

सरकारी कोविड हेल्थ सेंटर

* व्हेटिलेटर बेड - ०२

* आयसीयु बेड - ०८

* ऑक्सिजन बेड -२४

* सर्वसाधारण बेड -३२

Web Title: Private doctor helpless due to lack of oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.