झेरॉक्स सेंटरवर छापा
By Admin | Updated: February 21, 2016 23:47 IST2016-02-21T23:34:05+5:302016-02-21T23:47:53+5:30
अहमदनगर : पुस्तकांचे रिडक्शन (लघुआकार) करून त्याची विक्री करणाऱ्या वाडिया पार्क परिसरातील विशाल झेरॉक्स सेंटरवर कोतवाली पोलिसांनी शनिवारी दुपारी कारवाई केली.

झेरॉक्स सेंटरवर छापा
अहमदनगर : पुस्तकांचे रिडक्शन (लघुआकार) करून त्याची विक्री करणाऱ्या वाडिया पार्क परिसरातील विशाल झेरॉक्स सेंटरवर कोतवाली पोलिसांनी शनिवारी दुपारी कारवाई केली. या कारवाईत ५५ हजार रुपये किमतीचे कॉपी करण्यास उपयुक्त साहित्य जप्त करण्यात आले.
‘लोकमत’ने मंगळवारी (दि. १६) वाडिया पार्क परिसरात स्टिंग आॅपरेशन करून वाडिया पार्कमध्ये कॉप्यांचा सुळसुळाट होत असल्याचे निदर्शनास आणले होते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी (दि.१७) ‘कॉपी बहाद्दरांसाठी मार्केट रेडी’ या शिर्षकाखाली प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पोलीस यंत्रणेने कॉप्या तयार करणाऱ्या झेरॉक्स सेंटरवर करडी नजर ठेवली होती. तसेच पुस्तकांच्या कंपन्याही जाग्या झाल्या. त्यानंतर मुंबई येथील पुस्तक प्रकाशन कंपनीचे फैजल शरीफ पारकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर यांच्या पथकाने शनिवारी दुपारी तीन वाजता वाडिया पार्क परिसरातील विशाल झेरॉक्स सेंटरवर छापा टाकला. या प्रकरणी विजयकुमार सूर्यनारायण इगे (रा. जाधव मळा, बालिकाश्रम रोड) यांच्याविरुद्ध कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. याबाबत पारकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नवनीत एज्युकेशन प्रकाशन कंपनीचे दहावी आणि बारावीच्या वेगवेगळ््या विषयांच्या पुस्तकांच्या छोट्या आकारातील प्रती तयार करून त्याची अल्पदरात विक्री सुरू होती. पोलिसांनी झेरॉक्स प्रतींसह झेरॉक्स मशीन जप्त केले आहे. (प्रतिनिधी)