भाव घसरले, दूध उत्पादक हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:14 IST2021-06-29T04:14:59+5:302021-06-29T04:14:59+5:30
तिसगाव : दूध उत्पादक शेतकऱ्यांना कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे. दुधाला अपेक्षित दर नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. ३२ ...

भाव घसरले, दूध उत्पादक हवालदिल
तिसगाव : दूध उत्पादक शेतकऱ्यांना कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे. दुधाला अपेक्षित दर नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. ३२ रुपये लीटर असलेला दर सध्या २० रुपयांवर आला आहे. यामुळे साधा खर्चही निघत नाही.
पाथर्डी तालुक्यातील तिसगावसह पंचक्रोशीतील गावे, वाड्यावस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसाय चालतो. शेतीला जोड व्यवसाय म्हणून याकडे शेतकरी पाहतात. तिसगाव बसस्थानक, वृद्धेश्वर चौकात सकाळी व संध्याकाळी दूध विक्रेते असतात. त्यांच्या चर्चेतून दूध दर घसरल्याने येत असलेल्या अडचणींची माहिती मिळाली.
शिरापूरचे बाबासाहेब बुधवंत म्हणाले, कोरोना महामारीत सर्व काही बंधने असताना दर ३२ होता. आता खुले झाल्यांवर दर प्रतिलीटर २० होतोय म्हणजे ही बळीराजाची क्रूर थट्टाच नव्हे काय? दूध उत्पादनाचे दर घसरत चालले. मात्र त्या तुलनेत पशुखाद्यांचे दर वाढत आहेत. ही बाब लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणांच्या लक्षात येत नाही का, सर्व संकटे आले की बळीराजाच्याच माथी का, असा संताप ढवळेवाडीचे सरपंच बाबासाहेब चितळे यांनी व्यक्त केला.
दूध संस्थेचे अध्यक्ष कांता गोरे, महेश लवांडे यांनी तर उसाला एफआरपीनुसार दर दिला जातो. तीच पद्धती दूध धंद्यातही अमलात आणायला हवी. उत्पादन खर्चांशी निगडित दूध दर मिळावेत, अशी मागणी जोर धरीत आहे.