आरक्षणाला हात लावल्यास किंमत चुकवावी लागेल
By Admin | Updated: April 22, 2016 00:13 IST2016-04-22T00:02:05+5:302016-04-22T00:13:10+5:30
शिर्डी : सरकार दलितांचे आरक्षण काढणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी काँग्रेस राजकारण करत भाजपाला या मुद्द्यावर बदनाम करीत असल्याचा आरोप आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केला़

आरक्षणाला हात लावल्यास किंमत चुकवावी लागेल
शिर्डी : पंतप्रधान मोदी यांनी सरकार दलितांचे आरक्षण काढणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी काँग्रेस राजकारण करत भाजपाला या मुद्द्यावर बदनाम करीत असल्याचा आरोप आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केला़ पंतप्रधान मोदींनी भाजपा,संघाच्या विचारसरणीनुसार आमच्या आरक्षणाला हात लावण्याचा प्रयत्न केला तर त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला़
समाजातील तेढ संपवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या भारत भीम यात्रेच्या निमित्ताने शिर्डीत आलेल्या आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ यावेळी तानसेन ननवरे,श्रीकांत भालेराव,बाबुराव कदम,अशोक गायकवाड,दीपक गायकवाड, आत्माराम वाघमारे, डॉ़राजेंद्र पिपाडा, राजू विघे, सुभाष त्रिभुवन,आबा ननवरे, राजेंद्र मगर, कैलास शेजवळ, रमेश गायकवाड, चांगदेव जगताप आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती़
मुंबई महापालिका निवडणुकीत अशक्य वाटत असले तरी सेना-भाजपाला एकत्र आणून त्यांच्यासह निवडणूक लढवण्याचा प्रयत्न आहे़ मात्र तसे झाले नाहीतर जो आमच्या बरोबर येईल त्याच्यासह लढू असे आठवले यांनी सांगितले़ काँग्रेस पक्ष जातीयवादी नसला तरी त्यातील काही नेते जातीयवादी आहेत़ त्यामुळेच आपल्या विषयी अपप्रचार करून शिर्डीत आपला पराभव करण्यात आल्याचा आरोप आठवलेंनी केला़ आमच्या मदतीमुळे भाजप सत्तेत आहे. आम्ही त्यांचे मित्र आहोत, गुलाम नाही. सत्तेत वाटा देण्यास दिरंगाई होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत पाच वर्षे पूर्ण झाल्यावर सत्तेत वाटा देणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला़ मुस्लिमांना आठ टक्के आरक्षण द्यावे, संस्थान विश्वस्त मंडळ तातडीने नियुक्त करावे, तातडीने चारा छावण्या सुरू करण्याबाबत किंवा घरपोच चारा देण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी आठवले यांनी केली़ मंदिरात महिलांना प्रवेश द्यावा अशी सरकारचीही भूमिका असून यात काँग्रेस राजकारणासाठी आंदोलनाला छुपी मदत करत असल्याची शंका त्यांनी उपस्थित केली़शंकराचार्यांची साईबाबांविषयीची वक्तव्ये गैर असल्याचे मतही आठवलेंनी व्यक्त केले़
दलित चळवळीतील युवा नेते चांगदेव जगताप यांनी खासदार आठवले यांच्या उपस्थितीत यावेळी आरपीआय मध्ये प्रवेश केला. जगताप यांच्यावर उत्तर नगर जिल्हा युवक आरपीआय कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे़
(तालुका प्रतिनिधी)