सॅनिटायझरचे दर पाचशेवरून शंभर रुपये लीटरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:22 IST2021-05-27T04:22:18+5:302021-05-27T04:22:18+5:30

श्रीरामपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत मागील वर्षी सॅनिटायझरचे दर आभाळाला भिडले होते. पाच लीटरच्या एका ड्रमचे दर त्यावेळी अडीच ...

The price of sanitizer ranges from Rs.500 to Rs.100 per liter | सॅनिटायझरचे दर पाचशेवरून शंभर रुपये लीटरवर

सॅनिटायझरचे दर पाचशेवरून शंभर रुपये लीटरवर

श्रीरामपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत मागील वर्षी सॅनिटायझरचे दर आभाळाला भिडले होते. पाच लीटरच्या एका ड्रमचे दर त्यावेळी अडीच हजार रुपयांवर पोहोचले होते. आता मात्र पाचशे रुपयांच्या आत हे सॅनिटायझर उपलब्ध होत आहे. त्यातही आकर्षक स्प्रेमध्ये सुगंधी सॅनिटायझरही बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत.

सॅनिटायझरच्या मागणीत अचानक वाढ झाल्याने, पहिल्या लाटेत तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे काळ्या बाजारात विक्रीचे प्रकार घडले होते. त्याला चाप लावण्यासाठी सार्वजनिक खाद्य वितरण विभागाने सॅनिटायझरच्या किमतीवर नियंत्रण आणले होते. दोनशे मिलीची किंमत शंभर रुपयांपेक्षा जास्त नसावी, अशी अधिसूचना जारी करण्यात आली होती.

यानंतरच्या काळात साखर कारखाने, तसेच डिस्टलरी प्रकल्पांना सॅनिटायझर निर्मितीसाठी ऑनलाइन पद्धतीने तातडीने मंजुरी देण्याचे धोरण सरकारने राबविले होते. यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन निर्मिती होऊन सॅनिटायझरचे भाव स्थिर झाले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तर सॅनिटायझरच्या किमतीत घसरण झाली आहे. अनेक कंपन्यांनी या क्षेत्रात उडी घेतल्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढला आहे. एवढेच नाही, तर अनेक छोट्या-मोठ्या कंपन्याही जिल्हा स्तरावर या क्षेत्रात उतरल्या आहेत.

------

असे घटले दर

मागील लाटेत दर : ५ लीटर : २,५००

सध्याचे पाच लीटरचे दर : ५००

ब्रॅण्डेड दर : १०० मिली : ४५ ते ५० रुपये.

-----

अनेक फ्लेवर बाजारात

सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे काही ग्राहकांना हा वास रुचत नाही. ग्राहकांची ही आवड-निवड ओळखून कंपन्यांनी आता नवनवीन फ्लेवरमधील सॅनिटायझर बाजारात आणले आहेत. लेमन, सँडलवूड, कोकोनट, रोझ अशा फ्लेवरमधील सॅनिटायझर ग्राहकांना उपलब्ध झाले आहेत.

-----

जेलपेक्षा लिक्विडला मागणी

जेल स्वरूपातील सॅनिटायझरही आता बाजारात मिळत आहे. मात्र, त्या तुलनेत लिक्विडला ग्राहकांकडून जास्त पसंती दिली जात आहे. लिक्विडमुळे हाताबरोबरच कपडे व वस्तूंवर फवारणी करणे शक्य होते. त्याचबरोबर, खिशात पेनप्रमाणे आकर्षक व छोट्या आकाराचे स्प्रे कंपन्यांनी बनविल्यामुळे ते सहजासहजी वापरणे सोयीचे झाले आहे.

---

सॅनिटायझर वापरापूर्वीची काळजी

‌सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण किमान ७० ते ८० टक्के असणे आवश्यक आहे, तरच त्वचेवर असलेल्या कोविड विषाणूला नष्ट करता येते. त्यामुळे ग्राहकांनी खरेदीपूर्वी ही गोष्ट तपासून घ्यायला हवी.

‌-----

‌सॅनिटायझरच्या वापरापूर्वी हातावर जर साबण किंवा तिखट पदार्थांचा अंश राहिलेला असेल, तर त्यामुळे हाताची जळजळ होऊ शकते. मात्र, बऱ्याचदा ॲलर्जीमुळे काही लोकांना सॅनिटायझरचा त्रास होतो. काही अपवाद वगळता सर्वांनाच त्याची अडचण येत नाही.

‌- पी.एन. कातकडे, सहायक आयुक्त,‌ अन्न व औषध प्रशासन, नगर

----

Web Title: The price of sanitizer ranges from Rs.500 to Rs.100 per liter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.