आधीचे २५ टक्के टार्गेट पूर्ण; अठरा वर्षांपुढील ३० लाख जणांना मिळणार लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:21 IST2021-04-22T04:21:34+5:302021-04-22T04:21:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील साडेतीन लाख नागरिकांना कोरोनावरील लस देण्यात आली असून, अठरा वर्षांपुढील ३० ...

आधीचे २५ टक्के टार्गेट पूर्ण; अठरा वर्षांपुढील ३० लाख जणांना मिळणार लस
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील साडेतीन लाख नागरिकांना कोरोनावरील लस देण्यात आली असून, अठरा वर्षांपुढील ३० लाख जणांना येत्या १ मेपासून लस दिली जाणार आहे. हा सर्वात मोठा लसोत्सव असणार आहे. त्यामुळे या टप्प्यातील लसीकरण करण्याचे मोठे आव्हान प्रशासकीय यंत्रणेसमोर असणार आहे.
कोरोनाने जिल्ह्यात कहर माजविला आहे. दररोज तीन हजारांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेने दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहेत. सोबतच जिल्ह्यातील नागरिकांना लस देण्याची मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतलेली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. शासनाने ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे निर्देश यापूर्वीच दिलेले आहेत. आता अठरा वर्षांपुढील सर्वांना लस देण्याचा मोठा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. ही मोहीम येत्या १ मेपासून सुरू होणार आहे. सन २०११च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील लोकसंख्या ४५ लाख ४३ हजार १५९ इतकी आहे. यापैकी ३६ लाख ३० हजार ५४२ म्हणजे ८० टक्के नागरिक ग्रामीण भागातील आहेत, तर नऊ लाख १२ हजार ६१७ म्हणजे २० टक्के नागरिक शहरी भागात राहतात. ही आकडेवारी दहा वर्षांपूर्वीची आहे. सध्याची लोकसंख्या ५० टक्के इतके असेल, असा अंदाज आहे. यामध्ये १८ वर्षांपुढील व्यक्तींची संख्या ३५ लाख ५० हजार इतकी असावी, असा अंदाज आहे. त्यानुसार येत्या १ मेपासून किमान ३० लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन प्रशासनाला करावे लागणार असून, सर्व वयोगटातील व्यक्तींना लस देण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.
....
जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या
सन २०११च्या जनगणनेनुसार
- ४५ लाख ४३ हजार १५९
पुरुष- २३,४२,८२५
स्त्री- २२,००,३३४
.....
४५ वर्षांपुढील २५ टक्के नागरिकांचे लसीकरण
जिल्ह्यात ४५ वर्षांपुढील नागरिकांची संख्या साधारणपणे १२ लाख ५० हजार इतकी असावी, असा अंदाज आहे. यापैकी तीन लाख ३९ हजार नागरिकांना लस देण्यात आली असून, हे प्रमाण २५ टक्के इतके आहे.
.....
लसीकरण केंद्र वाढवावे लागणार
जिल्ह्यात आरोग्य केंद्रांची संख्या कमी आहे. जिल्ह्यात २८ रुग्णालये, २८ दवाखाने, १०३ प्राथमिक आरोग्य केंद्र, ५५५ उपकेंद्र कार्यरत आहेत. यामुळे इतर ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करावे लागतील. त्यासाठी विविध संस्था, साखर कारखाने आदींनी पुढे येण्याची गरज आहे.
....
६८ केंद्रांवर दिली जाते लस
शहरासह जिल्ह्यात ६८ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. सध्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस दिली जात आहे. परंतु, ही संख्या कमी असल्याने लसीकरण केंद्र वाढवावे लागणार आहेत.
....
३२ हजार नागरिकांनी घेतला दुसरा डोस
शासनाने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन, या लसींच्या दोन डोसमधील अंतर निश्चित केलेले आहेत. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर ४२ ते ५६, तर कोव्हॅक्सिनच्या दोन डोसामधील अंतर २८ ते ४२ दिवस इतके निश्चित करण्यात आले असून, जिल्ह्यातील ३२ हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.