संगमनेर : उपनगरातील एका ज्येष्ठ व्यक्तीला पोलीस असल्याचे भासवून दोन भामट्यांनी या व्यक्तीचे तीन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. शहरातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गावरील शेतकी संघाच्या प्रवेशद्वारासमोर बुधवारी ( दि.६) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कारभारी पुंजीराम पानसरे (वय ७०, सेवानिवृत्त, रा. गोविंदनगर, संगमनेर) हे शेतकी संघाच्या प्रवेशद्वारासमोर जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. ‘आम्ही पोलीस आहे, काल रात्री आम्ही गांजा पकडला असून त्याची चेकिंग चालू आहे.’ असे ते दोघे पानसरे यांना म्हणाले. पानसरे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, बोटातील दोन सोन्याच्या अंगठ्या या त्यांना एका पिशवीत टाकण्यास त्यांनी सांगितले. ही पिशवी त्या दोघांनी हातात घेऊन पुन्हा पानसरे यांच्याकडे दिली व ते निघून गेले. काही वेळाने पानसरे यांनी पिशवीत पाहिले असता सोन्याचे दागिने त्यात नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे पानसरे यांच्या लक्षात आले. त्यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक विजय खाडे तपास करीत आहेत.