बँकेच्या निवडणुकीत शिक्षकांची प्रतिष्ठा जपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:19 IST2021-02-15T04:19:48+5:302021-02-15T04:19:48+5:30
अहमदनगर : शिक्षक बँकेची निवडणूक लढताना शिक्षकांच्या प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. राजकारणापायी शिक्षकांनी पातळी सोडू नये, ...

बँकेच्या निवडणुकीत शिक्षकांची प्रतिष्ठा जपा
अहमदनगर : शिक्षक बँकेची निवडणूक लढताना शिक्षकांच्या प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. राजकारणापायी शिक्षकांनी पातळी सोडू नये, असे आवाहन शिक्षकनेते संजय कळमकर यांनी केले. गुरुकुल व शिक्षक समिती यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे होते. यावेळेस रा. या. औटी, संजय धामणे, नितीन काकडे, सुदर्शन शिंदे, सीताराम सावंत, राजेंद्र ठाणगे, वृषाली कडलग, भास्कर नरसाळे, राजेंद्र पटेकर, इमाम सय्यद, शिवाजी रायकर आदी उपस्थित होते.
कळमकर म्हणाले, शिक्षकांना आर्थिक स्थैर्य हवे असेल तर गुरुकुलला सत्तेत येणे आवश्यक आहे. बँकेत सत्ता आल्याबरोबर खासगी बँकाप्रमाणे सभासदांना मासिक पंचवीस हजार रुपये मर्यादेचे क्रेडिट कार्ड दिले जाईल. सध्या बँकेची स्वप्ने पाहणाऱ्यांची संख्या बेसुमार वाढली आहे. ज्याच्या पाठीशी चार सभासद नाहीत त्यांची समाज माध्यमावर चलती आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. या राजकरणापायी काही शिक्षक इतरांचा द्वेष करतात. शिक्षकी राजकारण फार मोठे नाही. त्यासाठी कुणी आपली पातळी सोडू नका. समाजात आज शिक्षकांची प्रतिमा काय आहे, याचे अवलोकन करा. शिक्षकी पेशाचा सन्मान वाढवण्याचा वसा गुरुकुलने घेतला आहे. त्याला कुणाकडून छेद जाता कामा नये, असे कळमकर म्हणाले.
.................
...तर मी बँकेत पाय ठेवणार नाही
माणसाने निवृत्तीनंतरचे आयुष्य कुटुंबासाठी व समाजासाठी द्यावे, असे सांगत रा. या. औटी म्हणाले, मी सेवानिवृत्त झाल्यानंतर बँकेत पाय ठेवणार नाही.
...........
गुरुकुलला सामाजिक चेहरा
संजय धामणे म्हणाले, गुरुकुलची मदत घेतली असती तर विकास मंडळाची वास्तू उभी राहिली असती. सहकारात दुसऱ्यांच्या मदतीने चांगली कामे होतात. सुदर्शन शिंदे म्हणाले, गुरुकुलला सामाजिक व संस्कृतिक चेहरा आहे. आज जमलेली गर्दी त्याचेच फलित आहे.
.............
आता तरी त्यांचे पाढे पाठ होतील
संजय कळमकर विरोधकाची खिल्ली उडवताना म्हणाले, मेळाव्याच्या गर्दीचे फोटो पाहून काही जणांनी आकडेमोड सुरू केली असेल. यांनी विद्यार्थ्यांना कधी गणित शिकवले नाही. आपल्या मेळाव्याच्या रांगा मोजण्याच्या निमित्ताने काहींचे पाढे तरी पाठ होतील.