स्थायी सभापती निवडणूकीचा प्रस्ताव तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:21 IST2021-02-13T04:21:17+5:302021-02-13T04:21:17+5:30
अहमदनगर : महापालिका स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक घेण्यासाठी तारीख व वेळ मिळावी, अशा अशायाचा प्रस्ताव नगरसचिव कार्यालयाकडून शुक्रवारी ...

स्थायी सभापती निवडणूकीचा प्रस्ताव तयार
अहमदनगर : महापालिका स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक घेण्यासाठी तारीख व वेळ मिळावी, अशा अशायाचा प्रस्ताव नगरसचिव कार्यालयाकडून शुक्रवारी तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव येत्या सोमवारी विभागीय आयुक्तांना सादर केला जाणार आहे. विभागीय आयुक्तांकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त झाले होते. नवीन आठ नगरसेवकांची सदस्य म्हणून नियुक्ती बुधवारी करण्यात आली. महापौर बाबसाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेऊन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. या सभेचा ठराव दुसर्या दिवशी गुरुवारी नगरसचिव कार्यालयास पाठिवण्यात आला. नगरसचिव एस. बी. तडवी यांनी सभापती पदासाठी वेळ व तारीख मिळावी, असा प्रस्ताव तयार करून त्यावर उपायुक्त डॉ प्रदीप पटारे यांची स्वाक्षरी घेतली आहे. आयुक्तांची मान्यता सोमवारी घेण्यात येणार असून, त्यानंतर प्रस्ताव नाशिक येथील विभागीय आयुक्तांना सादर केला जाणार आहे.
विभागीय आयुक्तांकडून निवडणूकीची तारीख जाहीर केली जाईल. स्थायी समितीत राष्ट्रवादीचे अविनाश घुले व समद खान, सेनेकडून रिता भाकरे, प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपकडून रविंद्र बारस्कर व वंदना ताठे स्थायी समितीवर गेले आहेत. बसपाकडून मुदस्सर शेख यांनी स्वत:चेच नाव दिले आहे.
....
राष्ट्रवादीच्या घुले यांच्याकडून सदस्यांच्या गाठीभेटी
स्थायी समितीत नव्याने सदस्य म्हणून नियुक्ती झलेले राष्ट्रवादीचे अविनाश घुले यांनी सभापती पदासाठीची तयारी सुरू केली आहे. त्यांनी सदस्याच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली असून, राष्ट्रवादीकडून त्यांच्या मागे ताकत उभी केली आहे. सभापती मनोज काेतकर यांच्या निवडीच्यावेळी सेनेचे योगिरात गाडे यांनी अर्ज दाखल केला होता. अखेरच्याक्षणी गाडे यांनी अर्ज मागे घेतल्याने कोतकर बिनविरोध सभापती झाले होते.