ग्रामीण भागातील दिव्यांगांना प्राधान्याने लस द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:20 IST2021-05-23T04:20:46+5:302021-05-23T04:20:46+5:30
सध्या सर्वत्रच कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. अनेक कुटुंबातील व्यक्ती कोरोनामुळे हिरावल्या आहेत. त्यात लसीकरण सर्वांसाठी आधार ठरले आहे; मात्र ...

ग्रामीण भागातील दिव्यांगांना प्राधान्याने लस द्यावी
सध्या सर्वत्रच कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. अनेक कुटुंबातील व्यक्ती कोरोनामुळे हिरावल्या आहेत. त्यात लसीकरण सर्वांसाठी आधार ठरले आहे; मात्र सध्या लसीकरणाची अवस्था वाईट आहे. आवश्यक प्रमाणात लस उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्रांवर गोंधळ होत आहे. त्यातच ग्रामीण भागात दिव्यांग व्यक्तींची मात्र मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. त्यांच्यापर्यंत लस पोहोचण्यासाठी कोणतीही यंत्रणा काम करताना दिसून येत नाही. ग्रामीण भागातील प्रत्येक गावात १० ते १५ दिव्यांग संख्या असेल; परंतु त्यांनासुद्धा लस मिळत नाही. खरे तर दिव्यांगांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे प्रथम त्यांचा विचार होणे गरजेचे असताना तालुक्यातील पुढारी किंवा इतर ओळखीचे लोक वशिला लावून आपल्या मर्जीतील लोकांना लस देत आहेत. त्यामुळे सकाळी ७ वाजल्यापासून रांगेत असणारा दिव्यांग तसाच बसून राहतो. नंतर दुपारी एक वाजता लस संपल्याचे सांगितले जाते.
त्यामुळे प्रशासनाने पुढील आठवड्यात प्रत्येक गावातील आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करून देण्यात यावी व "फ्रंट लाइन" च्या प्राधान्याने दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण करावे. अन्यथा नगर तहसीलदार दालनासमोर कोणतीही पूर्व कल्पना न देता सर्व दिव्यांग उपोषण करतील, असा इशारा रुद्र अपंग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रा. वसंत शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष आशाताई गायकवाड, जिल्हा सचिव बापू पांडुळे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल सोनवणे, महेश विभुते, जिल्हा सरचिटणीस अमोल कराळे, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख कैलास शेलार, जिल्हा संघटक बेबीताई देवकर, नगर तालुकाध्यक्ष रामजी तुपे, उपाध्यक्ष श्रीकांत काळे आदींनी दिला आहे.