आरामदायी प्रवासासाठी एसटीऐवजी ट्रॅव्हल्सला पसंती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:22 IST2021-07-28T04:22:32+5:302021-07-28T04:22:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : सार्वजनिक वाहतुकीमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीचा प्रवास अधिक सुरक्षित आहे. मात्र, आरामदायी ...

Prefer travels instead of STA for comfortable travel! | आरामदायी प्रवासासाठी एसटीऐवजी ट्रॅव्हल्सला पसंती !

आरामदायी प्रवासासाठी एसटीऐवजी ट्रॅव्हल्सला पसंती !

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : सार्वजनिक वाहतुकीमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीचा प्रवास अधिक सुरक्षित आहे. मात्र, आरामदायी प्रवास, वेळॆच्या बचतीसह स्वच्छतेला जिल्ह्यातील प्रवासी एसटीऐवजी खासगी ट्रॅव्हल्सलाच पसंती देत आहेत.

जिल्ह्यात सार्वजनिक वाहतुकीत राज्य परिवहन महामंडळ एक नंबरवर आहे. प्रत्येक गावचा प्रवासी गेली अनेक वर्षे महामंडळाच्या एसटीला जोडला गेलेला आहे. परंतु, गेल्या दीड वर्षात कोरोनाचा एसटी महामंडळावर विपरीत परिणाम झाला आहे. बसच्या दैनंदिन फेऱ्यांचे वेळापत्रकदेखील काहीसे कोलमडले आहे. यातून मोठा आर्थिक फटकादेखील सोसावा लागत आहे. त्यातच अलीकडे प्रत्येकाचेच जीवनमान धावपळीसह आरामदायीदेखील झाले आहे. प्रत्येकालाच वेळेच्या बचतीसह आरामदायी प्रवास हवा आहे. त्यासाठी दोन पैसे जास्त खर्च करण्याचीदेखील तयारी असते. ट्रॅव्हल्समध्ये लांब पल्ल्याच्या प्रवासात वेळेची बचत होते. रात्रीच्या प्रवासात तर आरामात झोपून प्रवास करता येतो. त्यामुळे एसटीचा प्रवास जरी सुरक्षित असला तरी सर्वच प्रकारचा प्रवासीवर्ग तुलनेत खासगी ट्रॅव्हल्सकडे आकर्षित होत असल्याचे चित्र दिसत आहे.

.........

खासगी वाहनांच्या अपघातांत वाढ

अलीकडच्या काळात खासगी वाहनांच्या अपघातांत वाढ झाली आहे. बहुतांश अपघात खराब रस्त्यामुळे होत असले तरी याला वाहनचालक तेवढेच जबाबदार आहेत. कारण, रस्ता चांगला असल्यास वाहने सुसाट वेगाने चालवली जातात. त्यामुळे वाहनावर नियंत्रण मिळवणे कठीण होत असल्याने अनेक वेळा अपघाताच्या घटना घडत आहेत.

......

एसटीला स्पीड लॉक, ट्रॅव्हल्स सुसाट

मोटार वाहन कायद्यानुसार एसटींना स्पीड लॉक करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गावर ८० किलोमीटर प्रति तास, राज्य महामार्गावर ७० किलोमीटर प्रति तास स्पीड लॉक करण्यात आले आहे. ट्रॅव्हल्सला मात्र तसे कोणत्याही प्रकारचे लॉक नाही. त्यामुळे त्या गाड्या सुसाट असतात, एसटीच्या तुलनेत ट्रॅव्हल्स कमी वेळेत पोहोचतात.

.............

ट्रॅव्हल्सचा प्रवास आरामदायी असून लांब पल्ल्यासाठी खूप फायदेशीर आहे. एसटीच्या तुलनेत ट्रॅव्हल्सला थांबे कमी असतात. त्यामुळे वेळेची बचत होते. याउलट एसटीला खूप थांबे, स्वछतेचा अभाव असतो. त्यामुळे मी प्रवासासाठी एसटीऐवजी ट्रॅव्हल्सलाच पसंती देतो.

- हर्षल जाधव, प्रवासी

..................

मला कामानिमित्त कायम इंदोरला जावे लागते. हा प्रवास करताना एसटीने १२ तास लागतात तर ट्रॅव्हल्सने ८ तासात ठिकाणावर पोहोचविले जाते. शिवाय हा प्रवास झोपून करता येतो. त्यामुळे नियोजित कामदेखील उत्साहात होते आणि परतीच्या प्रवासाचे तिकीटदेखील ऑनलाइन बुकिंग करता येते. त्यामुळे ट्रॅव्हल्सचा प्रवास सुखकर वाटतो.

- प्रा. गणेश सपकाळ, प्रवासी

.......

प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने महामंडळाच्या बसेसच्या स्वच्छतेकडे प्रामुख्याने लक्ष दिले जात आहे. तसेच आरामदायी प्रवासासाठी बसमध्ये झोपून प्रवास करण्याचीदेखील सुविधा केलेली आहे. सध्या काही बसमधून प्रवास करण्यासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंगचीसुद्धा व्यवस्था केलेली आहे.

- अभिजित आघाव, आगारप्रमुख, एसटी महामंडळ, तारकपूर आगार

...........

जिल्ह्यात झालेले एसटी अपघात

२०१८ - १४४

२०१९ - १४२

२०२० - ६४

२०२१ - १२ (२७ जुलैपर्यंत)

...............

Web Title: Prefer travels instead of STA for comfortable travel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.