प्रवरेच्या विद्यार्थ्यांनी बनविला पक्ष्याप्रमाणे उडणारा ड्रोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:46 IST2021-09-02T04:46:23+5:302021-09-02T04:46:23+5:30
सीआरएफसी कार्बन फायबर रिइन्फोर्स्ड ऑप्टिमिस्टिकचा वापर करून या ड्रोनचा सांगाडा तयार करण्यात आला आहे. साधे प्लास्टिक कागदाचे पंख त्याला ...

प्रवरेच्या विद्यार्थ्यांनी बनविला पक्ष्याप्रमाणे उडणारा ड्रोन
सीआरएफसी कार्बन फायबर रिइन्फोर्स्ड ऑप्टिमिस्टिकचा वापर करून या ड्रोनचा सांगाडा तयार करण्यात आला आहे. साधे प्लास्टिक कागदाचे पंख त्याला लावले आहेत. ड्रोनच्या पंखांची हालचाल नियंत्रित करण्यासाठी गिअर बॉक्स आणि दोन ऑर्डिनो कंट्रोलर्स वापरले आहेत. गती तसेच दिशा नियंत्रणासाठी ऑक्सिलोमीटर आणि गायरोसेन्सर बसविले आहेत. एकदा ड्रोन हवेत गेल्यावर त्याला ऑटोफ्लाईट मोडवरही नियंत्रित करणे शक्य होणार आहे. ड्रोनमध्ये हायलेन्स कॅमेरा वापरून संगणक प्रणालीच्या साहाय्याने रिसिव्हर तसेच ट्रान्समिटरच्या साहाय्याने व्हिडीओ आणि फोटो घेऊन ते मोबाईलवर जतन करण्याचे कामही या ड्रोनव्दारे होणार आहे.
दोन पंख, शेपटी, पोटाचा आकारामुळे हा ड्रोन हुबेहुब पक्ष्यासारखा दिसतो. ड्रोनचे वजन पाचशे ग्रॅम इतके आहे. कमी वजन असल्याने अतिशय कमी ऊर्जेचा वापर या ड्रोनच्या उड्डाणासाठी लागतो. सध्या दोन बॅटरींचा वापर यात करण्यात आला असून एकदा चार्ज झाल्यावर तो दीड तास हवेत उड्डाण करू शकतो. हवेत झेप घेण्यासाठी या ड्रोनला रनवे घेण्याची गरज भासत नाही. भविष्यात बॅरोमीटरचा वापर करून आकाशात ठराविक उंचीवर ड्रोन स्थिर ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पक्ष्यांप्रमाणेच पंख हलवून तो झेपावत असल्याने टेहळणीसारख्या कामात तो सहजतेने वापरला जाऊ शकतो असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाणे, प्रा. राजेंद्र खर्डे, विभाग प्रमुख प्रा. संजय बेलकर, प्रा. अजय दिघे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले आहे.
..................
कमी खर्चात तयार केला ड्रोन....
महाविद्यालयाचे विद्यार्थी विश्वजीत कडलग, आशिष काळे, वैभव नेहे, प्रतीक भालरे या विद्यार्थ्यांनी हा ड्रोन तयार केला आहे. हा ड्रोन तयार करण्यासाठी अवघा साडेसहा हजार रुपये इतका खर्च आला आहे.
...................
पिकांचे होणार संरक्षण
अंतिम वर्षाच्या प्रकल्पा अंतर्गत विद्यार्थ्यांनी हा ऑर्निथॉप्टर ड्रोन तयार केला आहे. या ड्रोनचा उपयोग शेतीची निगराणी करणे, बाजरी, मका, ऊस, डाळिंब, द्राक्ष, पेरू अशा पिकांचे पक्ष्यांपासून संरक्षण करण्यासाठी केला जाऊ शकतो, असा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे.
310821\img_20210831_144250.jpg
लोणी येथील
प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला पक्ष्याप्रमाणे उडणारा ड्रोन