कृषी अधीक्षकपदावरुन दोन मंत्र्यांची ताकद पणाला
By Admin | Updated: March 17, 2016 23:43 IST2016-03-17T23:37:20+5:302016-03-17T23:43:17+5:30
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर आपलाच माणूस बसविण्यासाठी दोन मंत्र्यांनी ताकद पणाला लावली आहे़

कृषी अधीक्षकपदावरुन दोन मंत्र्यांची ताकद पणाला
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर आपलाच माणूस बसविण्यासाठी दोन मंत्र्यांनी ताकद पणाला लावली आहे़ कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी सध्याचे कृषी उपसंचालक आऱ के ़ गायकवाड यांना अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारण्याचे दिलेले आदेश गुंडाळून दुसऱ्या मंत्र्यांनी आपल्याच माणसाला खुर्चीवर बसविल्याची चर्चा कृषी विभागात खुलेआम सुरु आहे़
तत्कालीन कृषी अधीक्षक अधिकारी अंकुश माने यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर अकोला येथील रमेश गोसावी यांना पदोन्नती देण्यात आली़ मात्र, गोसावी हजर होताच त्यांना दमबाजी करुन रजेवर पाठविण्यात आले़ त्यांनी प्रारंभी १४ दिवसांची रजा घेतली होती़ मात्र, ते अद्याप रुजू झाले नाहीत़ त्यांच्या रिक्त जागेवर आत्माचे संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे हे यांची नियुक्ती झाली. मात्र, बऱ्हाटे यांना कोणताही आदेश नसताना ते या खुर्चीत बसून कारभार हाकीत आहेत़ कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्या आदेशानुसार कृषी आयुक्तांनी कृषी उपसंचालक आऱ के ़ गायकवाड यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर नियुक्ती दिली़ मात्र, बऱ्हाटे हे गायकवाड यांच्याकडे पदभार देत नाहीत़ बऱ्हाटे यांना दुसऱ्या मंत्र्यांचा पाठिंबा आहे़ त्यामुळे बऱ्हाटे खुर्ची सोडत नाहीत, अशी चर्चा कृषी विभागात रंगली आहे़
गोसावींना धमकी कोणी दिली
रजेवर गेलेले कृषी अधीक्षक गोसावी हे कृषीमंत्र्यांच्या जवळचे मानले जातात़ माने यांच्या बदलीनंतर गोसावींना नगरला नियुक्ती दिली़ मात्र, गोसावी यांनी पदभार स्वीकारताच त्यांना दुसऱ्या मंत्र्याने दम भरला़ म्हणून ते रजेवर गेल्याची चर्चा कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आहे़ ही चर्चा चोरीछुपके नाही, हे विशेष!
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्याचे आदेश भाऊसाहेब बऱ्हाटे यांना लेखी स्वरुपात दिले नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे़ याबाबत बऱ्हाटे यांना विचारले असता ते म्हणाले, कृषी आयुक्तांनी मला पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत़ हे आदेश दोघांनाही आहेत का असे विचारले असता बऱ्हाटे हो म्हणाले़
कृषी कार्यालयात तोडफोड
बुधवारी दुपारी तीन वाजता एका कर्मचाऱ्याने सीसीटीव्ही कॅमेरा तोडल्याची घटना घडली़ या घटनेलाही दोघा अधिकाऱ्यांमधील वर्चस्वाची झालर असल्याचे बोलले जात आहे़ बऱ्हाटे यांनी पदभार न सोडल्यास कृषी विभागात आता दंडुके घेऊन यावे लागेल, अशी परिस्थिती ओढावल्याचे कर्मचारी बोलत आहेत़