शेवगाव तालुक्यात विद्युत यंत्रणेचे सक्षमीकरण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:28+5:302021-07-02T04:15:28+5:30

अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील गावे अंधारात नसून संबंधित गावांतील ग्रामस्थांनी वीजजोडणीसाठी अर्जच केले नसल्याचे महावितरणने पत्रकात म्हटले आहे. तसेच ...

Power system will be empowered in Shevgaon taluka | शेवगाव तालुक्यात विद्युत यंत्रणेचे सक्षमीकरण करणार

शेवगाव तालुक्यात विद्युत यंत्रणेचे सक्षमीकरण करणार

अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील गावे अंधारात नसून संबंधित गावांतील ग्रामस्थांनी वीजजोडणीसाठी अर्जच केले नसल्याचे महावितरणने पत्रकात म्हटले आहे. तसेच शेवगाव तालुक्यातील विद्युत यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यासाठी एक आराखडा तयार करण्यात येत असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

‘शेवगाव तालुक्यातील गावे अंधारात’ या मथळ्याखाली गुरुवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाले आहे. शेवगाव तालुक्यातील चेडे चांदगाव, कोनाशी, राणेगाव व बेलगावजवळ वीज असूनसुद्धा चारही गावे अंधारात आहेत. या गावात वीज नसल्यामुळे नागरिकांना अंधारातच राहावे लागत असल्याचे या वृत्तात म्हटले होते. याबाबत महावितरणचे ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोनोशी या गावात कृषिवाहिनीच्या माध्यमातून एसडीटीमधून मागील दहा वर्षांपासून वीजपुरवठा केला जात आहे. कोनोशी येथे असलेल्या गावठाण रोहित्रावरून जवळपास ८० ग्राहकांना वीजपुरवठा देण्यात आला आहे. बेलगाव येथेसुद्धा चापडगाव ११ केव्ही विद्युत वाहिनीवरून वीजपुरवठा उपलब्ध आहे. पण तेथे असलेल्या पोपळे वस्तीवरील ग्राहकांना महावितरणने प्रत्यक्ष संपर्क करूनसुद्धा वीजपुरवठ्यासाठी त्यांनी अर्ज केलेले नाहीत. विजेची थकबाकी न भरल्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेले ग्राहक आहेत, त्यांचा नवीन जोडणीसाठी प्रतिसाद नाही. राणेगाव येथे वीजपुरवठ्यासंदर्भात अडचण नसून तेथील वाघवस्तीमधील ७ घरगुती वीजजोडण्या द्यावयाच्या आहेत. त्याचा जिल्हा नियोजनामधून आराखडा मंजूर झाला असून, निधी उपलब्ध होताच तात्काळ जोडण्या देण्यात येणार आहेत. चेडे चांदगाव येथे कृषी वाहिनीच्या माध्यमातून वीजपुरवठा देण्यात येत आहे. तेथील विद्युत यंत्रणेचे आणखी सक्षमीकरण करण्यासाठी आराखडा बनविण्यात आला आहे, असे पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Power system will be empowered in Shevgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.