श्रीगोंद्यातील शक्तिस्थाने गर्दीने फुलली
By Admin | Updated: October 7, 2016 00:54 IST2016-10-07T00:22:43+5:302016-10-07T00:54:59+5:30
श्रीगोंदा : शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त श्रीगोंदा तालुक्यातील देवीची मंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलली आहेत. विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनांनी गावे भक्तिमय झाली आहेत.

श्रीगोंद्यातील शक्तिस्थाने गर्दीने फुलली
श्रीगोंदा : शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त श्रीगोंदा तालुक्यातील देवीची मंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलली आहेत. विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनांनी गावे भक्तिमय झाली आहेत.
श्रीगोंदा येथील साळवणदेवी, कोळगावची कोळाई देवी, पिंपळगाव पिसा येथील रेणुकामाता, रायगव्हाण व थिटे सांगवी येथील पद्मावती देवींची देवालये प्रसिद्ध आहेत. यंदा पाऊस चांगला झाल्याने भाविकांमध्ये उत्साह आहे.
श्रीगोंदा येथील साळवणदेवीचे मंदिर पेशवेकालीन असून साळवणदेवी तालुक्यातील प्रसिद्ध देवी आहे. श्रीगोंदा शहरापासून साळवणदेवीचे मंदिर अवघे तीन कि.मी. अंतरावर आहे. सातव्या माळेला येथे यात्रौत्सव साजरा केला जातो.
कोळगाव येथील कोळाई देवीचे डोंगरावर मंदिर आहे. सातव्या माळेला भाविकांची मोठी गर्दी होते. काही भक्त दहा दिवस मंदिरात देवीच्या सानिध्यात राहतात. पिंपळगाव पिसा येथील रेणुकामाता देवीच्या दर्शनासाठी रोज पहाटे गर्दी होते. येथे येणाऱ्या महिला भाविकांची संख्या लक्षणीय असते. थिटे सांगवीत पद्मावती देवीच्या दर्शनासाठी घोगरगाव, बनपिंपरी, सांगवी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने येतात. विजयादशमीच्या एक दिवस अगोदर येथे यात्रा भरते.
रायगव्हाण येथे पद्मावती देवीचे पुरातन मंदिर आहे. रायगव्हाण परिसरातील दहा ते बारा गावांमधील भाविक दर्शनासाठी येतात. पेडगाव किल्ल्याशेजारी महादजी शिंदे यांनी भवानी मातेचे मंदिर बांधले आहे. मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते.
(तालुका प्रतिनिधी)