पोस्टमनची हाक होतेय दुर्मिळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:27 IST2021-09-10T04:27:22+5:302021-09-10T04:27:22+5:30
काळानुसार पोस्टमनची प्रतीक्षा करण्याची वेळ संपत चालली आहे. दारावर वाजणारी टिकटिक किंवा पोस्टमन हा शब्द कानी पडणे दुर्मिळ होत ...

पोस्टमनची हाक होतेय दुर्मिळ
काळानुसार पोस्टमनची प्रतीक्षा करण्याची वेळ संपत चालली आहे. दारावर वाजणारी टिकटिक किंवा पोस्टमन हा शब्द कानी पडणे दुर्मिळ होत चालले आहे. पोस्टमन आल्यावर लहान-मोठे धावत यायचे, पत्र हाती पडताच घरातील मंडळी आनंदित व्हायचे. परंतु आता मोबाइल, व्हिडिओ कॉलिंग, फेसबुक, व्हाॅट्सअप, ईमेल आदी साधनांमुळे तत्काळ वार्तालाप होत आहे. त्यावेळी पोस्टमनच्या हातात एखादा टेलिग्राम दिसला की मनात भीतीचे वादळ निर्माण व्हायचे. ज्या घरी पोस्टमन पत्र घेऊन जायचा तेथे शेजारी जमा व्हायचे. पत्रामध्ये आनंद असो की दुःखांचा समाचार असो. सर्व शेजारधर्म पाळत होते. परंतु आताच्या काळात शेजारधर्म पाळण्याकडे कोणालाही वेळ नसल्याचे चित्र दिसून येते. एकेकाळी पोस्टमनला ग्रामीण भागात देवदूत समजले जात होते.
अशिक्षित लोकांना पत्र वाचून दाखवणे, मनीऑर्डरचे पैसे बरोबर पोहोचवणे त्यांचे काम होते. पण आता मनीऑर्डर जवळपास बंद झाल्यात जमा आहेत. ग्रामीण भागात जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या खिशात एटीएम कार्ड आहे. क्षणात एटीएमवर जाऊन पैसे काढता येऊ लागले. परंतु मनीऑर्डर आणणाऱ्या पोस्टमनला पाहून जो आनंद व्हायचा तो आता एटीएममुळे होत नाही.
................
माणुसकी कमी होतेय
आज घडीला विदेशातील, दूरगावी असलेला मित्र नातेवाईक लॅपटॉप, संगणकावर, मोबाइलवर ऑनलाइन चॅटिंग, व्हिडिओ कॉल करू शकतात. अत्याधुनिक फायदा होत असला तरी माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. सोशल मीडिया, सोशल साईटसचा वापर वाढल्याने माणुसकी कमी होत चालली आहे.