डाक बंगला बनलाय म्हशींचा गोठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:25 IST2021-08-27T04:25:01+5:302021-08-27T04:25:01+5:30
राजूर : अकोले तालुक्यातील जानेवाडी येथील ब्रिटिशकालीन डाक बंगल्याची दुरवस्था झाली आहे. सध्या हा बंगला म्हशींचा गोठा बनला असून ...

डाक बंगला बनलाय म्हशींचा गोठा
राजूर : अकोले तालुक्यातील जानेवाडी येथील ब्रिटिशकालीन डाक बंगल्याची दुरवस्था झाली आहे. सध्या हा बंगला म्हशींचा गोठा बनला असून यात चाराही साठविला जात आहे.
पर्यटनदृष्ट्या समृद्ध बनू पाहत असलेल्या कुमशेत परिसरातील जानेवाडी हे एक आदिवासी खेडेगाव. ब्रिटिशकाळात रतनगडावरून ते कात्राबाईच्या खिंडीतून कुमशेत परिसरात जाण्यासाठी असलेल्या वाटेवर असणाऱ्या जानेवाडी येथे ब्रिटिशांनी येथे विश्रांतीसाठी एक बंगला उभारला होता. परिसरातील निसर्गाचा मनोहारी आविष्कार या ठिकाणाहून न्याहळता येणारे असे हे ठिकाण आहे. दगडी बांधकामात उभारलेल्या बंगल्यावर पत्र्याचे छत असून निवासासाठी चार स्वतंत्र खोल्या आहेत.
या बंगल्याच्या दरवाजाच्या सर्व फळ्या आणि खिडक्या गायब झाल्या आहेत. पत्रे गंजून गेले आहेत. समोरच्या मोकळ्या पडवीत सध्या म्हशी बांधण्यात येत आहेत. या बंगल्याच्या खोल्यांमध्ये सध्या जनावरांचा चाराही साठविण्यात आलेला आहे.
.........
सरकारच्या नावाने सातबारा
या बंगल्याची दुरुस्ती केल्यास पर्यटकांना या ठिकाणी एक हक्काचे ठिकाण होऊ शकेल आणि यातून एक उत्पन्नाचे साधन ही होईल. ब्रिटिश ज्यावेळी भारतातून गेले, त्यावेळी या बंगल्यावर पी ४ /६ असा क्रमांक टाकण्यात आलेला असल्याचे दिसून येत आहे. हे क्रमांक टाकण्याची पद्धत ही सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. मात्र या बंगल्याचे कागदपत्रे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नाहीत. या जागेचा उतारा सरकार या नावाने निघत असल्याचे शाखा अभियंता शिंदे यांनी सांगितले.
..........
दुरुस्ती करावी
हा बंगला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिल्यास त्याची दुरवस्था संपून एक चांगली इमारत पुन्हा आपले मूळरूप घेईल आणि पर्यटकांचे एक चांगले निवासस्थान होईल, असे मत येथे भटकंतीसाठी आलेल्या पर्यटकांनी व्यक्त केले.